सध्या आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये ३०० धावा नियमितपणे होत असतात. नुकत्याच संपलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सहापैकी पाच डावांमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा बनल्या. मात्र, काही कालावधीपूर्वी ३०० धावा म्हणजे विजयाची गॅरंटी मानल्या जायच्या. १९७५ च्या विश्वचषकात इंग्लंडने भारताविरुद्ध सर्वप्रथम ३०० धावांचा टप्पा गाठलेला. आज आपण आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३०० धावा ठोकणाऱ्या पाच संघांविषयी जाणून घेणार आहोत.
१) भारत (१२०)
आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३०० धावा ठोकण्याचा मान भारतीय संघाकडे जातो. भारताने आतापर्यंत तब्बल १२० वेळा ही कामगिरी केली आहे. त्यातील ५ वेळा संघाने ४०० पेक्षा जास्त धावा बनविल्या आहेत. भारताने सर्वप्रथम ३०० धावांचा पल्ला पाकिस्तानविरुद्ध १५ एप्रिल १९९६ मध्ये शारजा येथे पार केला होता. भारताची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ४१८ असून ती वेस्ट इंडिजविरुद्ध केली गेली आहे.
२) ऑस्ट्रेलिया (१११)
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या संघांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दुसरा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत १११ वेळा ही कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा ३०० धावा ११ जून १९७५ रोजी श्रीलंकेविरुद्ध केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाची वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या ४३४ आहे.
३) दक्षिण आफ्रिका (८४)
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३०० पेक्षा जास्त धावा बनविणारा तिसरा संघ दक्षिण आफ्रिकेचा आहे. दक्षिण आफ्रिकेने ८४ वेळा ही कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने सर्वप्रथम ११ डिसेंबर १९९४ रोजी न्यूझीलंडविरुद्ध हा पल्ला गाठलेला. दक्षिण आफ्रिकेची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ४३८ असून ती त्यांनी ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गाठली होती.
४) इंग्लंड (८२)
वनडे क्रिकेटमध्ये सर्वप्रथम ३०० धावांचा पल्ला गाठणारा संघ इंग्लंडचाच आहे. इंग्लंडने आत्तापर्यंत ८२ वनडे सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावा ठोकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रमदेखील इंग्लंडच्या नावे असून त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४८१ धावा केल्या होत्या.
५) पाकिस्तान (८१)
पाकिस्तान संघाने देखील ८१ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा ठोकल्या आहेत. पहिल्या विश्वचषकात पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध सर्वप्रथम ३०० धावा बनविलेल्या. पाकिस्तानची वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या ३९९ असून त्यांनी ती झिम्बाब्वेविरुद्ध २०१८ मध्ये केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
असं नक्की घडलं काय की विराट आणि वूडमध्ये पेटला वाद, चाहत्यांनाही पडला प्रश्न
भारतीय संघ जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवणार का? इयान चॅपेल यांनी दिले उत्तर