वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) शनिवारी (५ फेब्रुवारी) १९ वर्षाखालील विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडला ४ विकट्सने मात देत भारताने विजय मिळवला. भारतीय संघाने ८ वेळा अंतिम सामना गाठला होता, तर पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा विक्रम नोंदवला आहे. याअगोदर २०००, २००६, २००८, २०१२, २०१६, २०१८ आणि २०२० मध्ये भारतीय १९ वर्षाखालील संघाने अंतिम सामना खेळला होता. दरम्यान, २०२२ विश्वचषक विजेत्या भारतीय संघासह एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS laxman) देखील वेस्ट इंडिजमध्ये उपस्थित होते.
त्यामुळे लक्ष्मण यांना खेळाडू म्हणून नाही, पण निदान मार्गदर्शक म्हणून विश्वविजयाची चव चाखता आली आहे. विशेष म्हणजे त्यांनी खेळाडू म्हणुन एकही विश्वचषक खेळलेले नाही. सध्या ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्याचमुळे ते युवा खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी वेस्ट इंडिजला गेले होते.
खरंतर २००३ साली झालेल्या वनडे विश्वचषकासाठी लक्ष्मण यांची भारतीय संघात निवड पक्की मानली जात होती. मात्र, त्यांना त्या विश्वचषकासाठी निवडलेल्या अंतिम संघात स्थान मिळाले नाही. या गोष्टीवरून मोठ्या चर्चाही त्यावेळी झाल्या होत्या. त्यानंतरही लक्ष्मण यांना कधीही विश्वचषकासाठी निवडण्यात आले नाही. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ८६ एकदिवसीय सामन्यांसोबतच अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत.
दरम्यान, आता लक्ष्मण एनसीएचे प्रमुख झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आणि विजयसुद्धा मिळवला. ते एनसीएचे प्रमुख झाले असले, तरी त्यांनी प्रशिक्षकाप्रमाणे खेळाडूंना मार्गदर्शन केले होते. ते संपुर्ण स्पर्धेत संघासोबत होते. तसेच भारतीय संघाने अंतिम सामना जिंकल्याने विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्मण यांचे स्वप्न साकार झाले आहे.
https://twitter.com/BCCI/status/1487372823467560962
द्रविडबरोबरही झाले होते असेच
लक्ष्मण यांच्यासारखेच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा सुद्धा खेळाडू असताना एकही विश्वचषक जिंकू शकला नव्हता. त्याने २००७ मध्ये विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते, परंतु भारताला साखळी फेरीतच बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा सागला होता. तसेच २००३ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत जाऊन पराभुत झाला होता. त्यावेळी राहुल द्रविड संघाचा उपकर्णधार होता. द्रविड ३ विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा भाग होता, परंतु एकदाही चषक जिंकू शकला नव्हता.
पण, त्यानंतर २०१८ मध्ये द्रविड १९ वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक असताना पहिल्यांदा विश्वचषक जिंकू शकला होता. २०१८ मध्ये पृथ्वी शाॅच्या नेतृत्वाखाली भारतीय १९ वर्षाखालील संघाने विश्वचषक जिंकला होता. तेव्हा प्रशिक्षकाच्या रुपात विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न द्रविडनी पुर्ण केले होते.
भारतासाठी लक्ष्मण यांनी ८६ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि ३०.७६ च्या सरासरीने २३३८ धावा केल्या आहेत. त्यांनी ६ शतक तर १० अर्धशतक झळकावली आहेत. त्यांनी पहिला एकदिवसीय सामना १९९८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. या सामन्यात ते शुन्यावरच बाद झाले होते. ८ वर्षानंतर २००६ मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्या सामन्यात सुद्धा ते शुन्यावरच बाद झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताने ५ व्यांदा जिंकला १९ वर्षांखालील विश्वचषक, पाहा आत्तापर्यंतच्या विश्वविजेत्यांची संपूर्ण यादी
विश्वविजेत्या खेळाडूंना द्यायला पैसे नव्हते म्हणून लतादीदींनी गायलं होतं गाणं






