पुणे, 30 जुलै 2023: गतविजेत्या चेन्नई लायन्सने अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत गतविजेत्यांनी पुणेरी पलटन टेबल टेनिस संघाचा ८-३ असा धुव्वा उडवला. चेन्नई लायन्ससमोर अंतिम सामन्यात गोवा चॅलेंजर्सचे आव्हान असणार आहे.
भारताचा स्टार खेळाडू अचंता शरत कमल याला चौथ्या व निर्णायक सामन्यात मानुष शाहचा सामना करावा लागला. अचंताने उल्लेखनीय खेळ करताना संघासाठी महत्त्वाचा आठवा गुण मिळवला अन् फायनलमधील प्रवेश निश्चित केला. युवा खेळाडू मानुषने पहिला गेम ११-५ असा जिंकला, परंतु अचंताने चांगले पुनरागमन करताना दुसरा गेम ११-५ असा जिंकला आणि चेन्नई लायन्सला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचवले. भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या (टीटीएफआय) मान्यतेखाली नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रँचायझी-आधारित अल्टिमेट टेबल टेनिस लीगला प्रोत्साहन दिले आहे.
त्याआधी, बेनेडिक्ट डुडाने पहिल्या सामन्यात २०१८च्या आयटीटीएफ आफ्रिकन चषक विजेत्या ओमार अस्सारवर ३-० असा विजय मिळवून चेन्नई लायन्सला दमदार सुरूवात मिळवून दिली. जागतिक क्रमावारीत २२व्या स्थानावर असलेल्या डुडाने पहिल्या गेमपासून आक्रमक खेळ करताना झोळीत गुण जमा केले. त्याने पहिला गेम ११-५ असा सहज जिंकला, परंतु दुसऱ्या गेममध्ये अस्सारकडून थोडी टक्कर मिळाली. मात्र, डुडाने ११-७ अशी बाजी मारली, तिसऱ्या गेममध्ये डुडाने आक्रमकता कायम राखताना ११-६ असा विजय मिळवला.
यांग्झी लियूने २-१ अशा फरकाने हाना माटेलोव्हाचा पराभव करून सीझन ४ मधील अपराजित मालिका कायम राखली आणि गतविजेत्यांची आघाडी मजबूत केली. ऑस्ट्रेलियन खेळाडूला पहिल्या गेममध्ये हानाविरुद्ध संघर्ष करावा लागला. हानाने पहिला गेम ११-३ असा जिंकला, परंतु लियूने जबरदस्त पुनरागमन करताना पुढील गेम ११-८ असा जिंकून सामना निर्णायक वळणावर आणला. त्यातही लियूने ११-७ अशी बाजी मारली.
तिसऱ्या लढतीत शरत कमल व यांग्झी लियू यांनी २-१ अशा फरकाने मानुष शाह व हाना यांचा पराभव करून चेन्नई लायन्सला ७-२ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. शरत/यांग्झी या जोडीने सकारात्मक खेळ करताना सामन्यावर पकड मिळवली आणि पहिला गेम ११-४ असा जिंकला. मानुष व हाना यांनी दुसऱ्या गेममध्ये ११-९ असे पुनरागमन केले. निर्णायक गेममध्ये चेन्नई लायन्सच्या जोडीने ११-६ असा विजय मिळवला. (Ultimate Table Tennis Tournament । Puneri Paltan was blown away by Chennai Lions)
निकाल
चेन्नई लायन्स ८-३ पुणेरी पलटन टेबल टेनिस
बेनेडिक्ट डुडा ३-० ओमार अस्सार ( ११-५, ११-७, ११-६)
यांग्झी लियू २-१ हाना माटेलोव्हा ( ३-११, ११-८, ११-७)
शरत/यांग्झी २-१ मानुष/हाना ( ११-४, ९-११, ११-६)
शरत कमल १-१ मानुष शाह ( ५-११, ११-५)
महत्वाच्या बातम्या –
कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर ब्रॉडने मारला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ पाहून फिरतील तुमचेही डोळे
‘ब्रॉडी तुला सलाम’, ब्रॉडच्या रिटायरमेंटवर आली युवीची प्रतिक्रिया, शेअर केले खास छायाचित्र