भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना शुक्रवार (३ डिसेंबर) पासून मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ ३२५ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. एजाजने पहिल्या डावात भारताच्या सर्व १० विकेट्स घेतल्या. भारताचा एकमेव खेळाडू उमेश यादव नाबाद राहिला. एजाझ पटेलने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केल्याचे तर सर्वांनाच समजले, पण भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने देखील एका खास विक्रमाची नोंद केली.
एजाज पटेलने सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरची विकेट घेतली, तर दुसऱ्या दिवशी राहिलेल्या सहा विकेट्स घेतल्या. भारताच्या डावाच्या शेवटच्या विकेटपूर्वी वगेवान गोलंदाज उमेश यादव आणि मोहम्मद सिराज खेळत होते. एजाजने या दोघांपैकी मोहम्मद सिराजची विकेट घेतली आणि भारतीय संघ सर्वबाद झाला. उमेश यादव शेवटपर्यंत नाबाद राहिला.
उमेश यादवने या सामन्यात एका खास विक्रमाची नोंद केली. उमेश यादव तिसरा खेळाडू ठरला आहे, जो शेवटपर्यंत नाबाद राहिला, जेव्हा विरोधी संघातील एकाच गोलंदाजाने कसोटी सामन्याच्या एका डावात १० विकेट्स घेतल्या.
कसोटी सामन्यात एका डावात १० विकेट्स घेणाऱ्यांमध्ये यापूर्वी इंग्लंडच्या जिम लॅकर आणि भारताच्या अनिल कुंबळे यांचा समावेश होता, एजाज आता या यादीत नव्याने सामील झाला आहे.
जिम लॅकरने ही कामगिरी १९५६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅंचेस्टर कसोटी सामन्यात केला होता, यावेळी ऑस्ट्रेलियाचे लॅन जॉन्सन नाबाद राहिले होते. तसेच अनिल कुंबळे यांनी १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दिल्लीत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात वकार युनूस शेवटपर्यंत नाबाद राहिले होते, तर आता भारताचा उमेश यादव शेवटपर्यंत नाबाद राहिला आहे, जेव्हा न्यूझीलंडच्या एजाज पटेलने कसोटीच्या एका डावात १० विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, एजाज पटेलने सामन्याच्या पहिल्या दिवशी चार आणि दुसऱ्या दिवशी सहा विकेट्स घेत भारतीय संघाला सर्वबाद केले. भारत दुसऱ्या दिवशी ३२५ धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावात भारतासाठी सर्वाधिक धावा सलामीवीर मयंक अगरवालने केल्या. मयंकने ३११ चेंडूंचा सामना केला आणि १५० धावां केल्या. यामध्ये त्याच्या १७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. त्यव्यतिरिक्त अक्षर पटेलनेही (५२) अर्धशतकी खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
साहाची विकेट एजाजसाठी भलतीच खास; १० बळी घेतल्यावरच नव्हे, तर ५ बळी घेताच पठ्ठ्याने केलाय भीमपराक्रम
पटेलच्या ‘परफेक्ट १०’चा थरार अनुभवा एकाच व्हिडिओतून, पाहा एकट्यानेच कशी उडवलीय भारताची दाणादाण