क्रिकेटचा खेळ जितका शरीराने आणि कौशल्याने खेळला जातो तितकाच तो डोक्याने देखील खेळला जातो. एखाद्या युक्तीने खेळ असा काही बदलतो की, मॅचच्या निकालावर परिणाम होतो. 1992 वर्ल्डकपवेळी न्यूझीलंडचे कॅप्टन मार्टिन क्रो यांनी स्पिनर्ससह बॉलिंगची सुरुवात केली. श्रीलंकेने देखील आपले पिंच हिटर्स ओपनर म्हणून उतरवले. सचिनला रोखण्यासाठी इंग्लंडच्या ऍश्ले जाईल्सने पॅड धरून बॉलिंग केलेली. याव्यतिरिक्त अगदीच इतिहासात जायचं म्हटलं तर, डग्लज जॉर्डीन यांनी ऍशेसमध्ये बॉडीलाईन बॉलिंग केलेली. त्यावेळी या सर्व रणनीती ठरलेल्या. यावर ड्रेसिंग रूममध्ये चर्चा झालेली. मात्र, क्रिकेट इतिहासात अशादेखील काही घटना घडल्या. ज्या कोणत्याही चर्चेविना, डोक्यामध्ये येतात क्षणी अंमलात आणल्या गेल्या. आजच्या लेखामध्ये आपण त्याच युक्त्यांविषयी जाणून घेणार आहोत, ज्या खेळाडूंनी मैदानात सुचताक्षणी अमलात आणल्या.
माहेला जयवर्धने हा श्रीलंकेत झालेल्या 2012 टी20 वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेचा कॅप्टन होता. मात्र, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील 22व्या मॅचदरम्यान कुमार संगकारा टॉससाठी संघाचा कॅप्टन म्हणून आला. सर्वांना वाटले की, माहेलाला दुखापत झाली असेल, पण तो खेळत असल्याची बातमी आली. चाहते आणि मीडिया आश्चर्यचकित झाली. अनेकांना प्रश्न पडला की, वर्ल्डकपच्या मध्यातच कॅप्टन बदलला काय?
टॉसदरम्यान संगकाराला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना संगकरा म्हणाला, “माहेलाने सलग तीन मॅचमध्ये टॉस हरला होता. त्यामुळेच तो मला म्हणाला टॉस उडवण्यासाठी तू जा.” त्या मॅचमध्ये रेकॉर्डला कॅप्टन म्हणून संगकाराचे नाव लागले. मात्र, फिल्डिंगवेळी जयवर्धनेच सर्वांना सूचना देत होता. यादरम्यान इतका आटापिटा करूनही संगकाराही टॉस जिंकू शकला नव्हता. या निर्णयाचे दुसरे कारण होते, वेस्ट इंडीजविरुद्धच्या मॅचमध्ये जयवर्धनेची मॅच फीस स्लो ओव्हर रेटमूळे कापली गेलेली. पुन्हा तो प्रसंग उद्भवू नये म्हणूनही हा निर्णय घेतला गेल्याचे नंतर म्हटले गेलेले.
क्रिकेटचे सर्वकालीन महान बॅटर म्हणून ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) यांचे नाव घेतले जाते. 1940 च्या काळात खेळलेल्या ब्रॅडमन यांच्या नावावरील कित्येक विक्रम आजही कायम आहेत. नेहमी वन डाऊन खेळणाऱ्या ब्रॅडमन यांनी 1937मध्ये एकदा सातव्या नंबरवर बॅटिंगला येत डबल सेंचुरी मारलेली. मात्र, दुखापतीमुळे अथवा इतर कारणामुळे नव्हे, तर शक्कल लढवून ते सातव्या नंबरवर बॅटिंगला आलेले. 1936-1937 ऍशेसच्या पहिल्या दोन्ही मॅचेस हरल्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला विजय गरजेचा होता. मेलबर्नच्या एमएसीजीवर न्यू इयरला सुरू झालेली ती टेस्ट पावसामुळे वेगळ्याच वळणावर गेली. ऑस्ट्रेलियाने आपली पहिली इनिंग 200 रन्सवर डिक्लेअर केली. पावसामुळे ओल्या झालेल्या पिचवर इंग्लंडने मास्टर स्ट्रोक खेळला आणि आपली पहिली इनिंग फक्त 76 रन्सवर थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियन कॅप्टन ब्रॅडमन यांनी त्यापेक्षा मोठी चाल खेळली. त्यांनी आपले टेल एन्डर्स ओपनिंगला पाठवले. हा निर्णय सर्वांना अवाक् करणारा होता.
ब्रॅडमन यांचा हा निर्णय फायद्याचा ठरला. ऑस्ट्रेलियाच्या पाच विकेट्स जाईपर्यंत 97 रन्स झाल्या. तोपर्यंत पीच सुकले. त्यानंतर सातव्या नंबरला बॅटिंगला आलेल्या ब्रॅडमन यांनी इतिहास रचला. 270 रन्सची इनिंग त्यांनी खेळली. विस्डेनने त्या इनिंगला ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ म्हटले. पुढे जाऊन ऑस्ट्रेलियाने 365 रन्सने ही मॅच जिंकली. इतकेच नव्हे तर उरलेल्या दोन्ही टेस्ट जिंकून त्यांनी पिछाडीवरून ऍशेस आपल्या नावे करण्याचा कारनामा करून दाखवला.
भारताचे सर्वकालीन महान बॅटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) हे त्यांच्या टेक्निकल बॅटिंगसाठी आजही ओळखले जातात. त्यांनी विना हेल्मेट वेस्ट इंडीजच्या तुफानी पेसर्सचा सामना केलेला. मात्र, 1981-1982 रणजी सेमीफायनलमध्ये त्यांनी आपले आणखी एक कौशल्य दाखवलेले. ते चक्क डाव्या हाताने बॅटिंग करू लागलेले. पहिल्या इनिंगमध्ये मुंबई 271 रन्सवर ऑल आऊट झाली. प्रत्युत्तरात कर्नाटकने 470 रन्स केले. दुसऱ्या इनिंगमध्ये मुंबईच्या 160 रन्सवर 6 विकेट्स पडलेल्या. आश्चर्यकारकरीत्या आठव्या नंबरवर सुनील गावस्कर बॅटिंगला उतरले. त्यांच्या आठव्या नंबरवर बॅटिंगला उतरण्यापेक्षा डाव्या हाताने बॅटिंग करण्याची जास्त चर्चा झाली. पहिल्या इनिंगमध्ये 8 विकेट घेणारे लेफ्ट आर्म स्पिनर रघुराम भट दुसऱ्या इनिंगमध्येही तशीच बॉलिंग करत होते. उजव्या बॅटर्सना ते अधिक त्रास देत होते. त्यावर उपाय म्हणून गावसकर यांनी एक तास डाव्या हाताने बॅटिंग करत नॉट आउट 18 रन्स केले. परिणामी, मॅच ड्रॉ राहिली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिनच्या ‘त्या’ हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच