भारतीय कर्णधार विराट कोहलीने २०१४ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मदत घेतली होती. यानंतर तो मिशेल जॉन्सनसारख्या गोलंदाजांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार झाला होता. विराट सध्या इंग्लंडविरुद्ध बुधवारपासून (०४ ऑगस्ट) सुरू झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. याच दरम्यान स्काय स्पोर्ट्सशी बोलताना त्याने या प्रसंगाची आठवण काढली आहे.
कोहलीने स्काय स्पोर्ट्सला सांगितले, “या स्तरावर दिर्घकाळ खेळल्याने तुम्हाला थोडी असुरक्षितता आणि भीती वाटते. इथे तुम्ही लोकांना वेगवेगळ्या परिस्थितीत किती चांगले खेळता हे सिद्ध करायचे असते.”
कोहलीने २०१४ मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर निराशाजनक कामगिरी केली होती. त्याने १० डावांमध्ये केवळ १३.५० च्या सरासरीने धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला परतला आणि कसोटी मालिकेत ६९२ धावा जोडल्या. तो म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मी प्रत्येक परदेशी दौरा एक अभियांत्रिकी चाचणी म्हणून घेत होतो. मला कुठेतरी उत्तीर्ण व्हावे लागेल आणि मला लोकांना दाखवावे लागेल की, मी या स्तरावरही खेळू शकतो, असा विचार माझ्या मनात चालू असायचा.”
याचदरम्यान, कोहलीला माहित झाले होते की, त्याचा हितचिंतक कोण होता आणि कोण नव्हता. याबद्दल तो म्हणाला की, “जेव्हा तुमचा वाईट टप्पा असेल तेव्हा कोणीही तुम्हाला मदत करणार नाही. त्यामुळे त्या टप्प्याला पार करण्यासाठी एकमेव पर्याय असतो, तो म्हणजे मेहनत करत राहणे. म्हणून मी घरी गेलो, मी थोडा निराश झालो. पण नंतर एक चांगली गोष्ट घडली. मला समजले की, कोण माझ्या बरोबर आहे आणि कोण नाही.”
“मी मुंबईलाही गेलो होतो. मी सचिन तेंडुलकरला फोन केला. त्याचा सल्ला मागितला होता. मला माझा खेळ दुरुस्त करायचा आहे. मला या पातळीवर धावा कशा करायच्या? हे जाणून घ्यायचे आहे. माझ्या मनात असे होते की, मी ऑस्ट्रेलियाला कसा जाईन आणि या खेळाडूंविरुद्ध कशा धावा काढेन. यावर सचिनने मला सांगितले होते की, तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी कसोटी क्रिकेट खेळू शकत नाही. तुम्ही तुमच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी हा खेळ खेळता. सचिनच्या मदतीनंतर जेव्हा मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो तेव्हा मी पूर्णपणे धाडसी होतो आणि परिणामी पुढे गोष्टी देखील चांगल्या घडत गेल्या,” असे शेवटी त्याने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० क्रमवारीत भुवनेश्वरला जबरदस्त फायदा, श्रीलंकेविरुद्ध घेतल्या होत्या सर्वाधिक विकेट्स
थोडीशी मजामस्ती! जेव्हा पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये झाली ख्रिस गेलची एन्ट्री, रंगला हास्यकल्लोळ
आयपीएलपूर्वी न्यूझीलंडचा संघ करणार बांगलादेश दौरा, असे आहे पूर्ण वेळापत्रक