भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमच्या मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एका कृतीने भारताचा कर्णधार विराट कोहली अडचणीत आल्याची चिन्हे आहेत.
विराटवर तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची बंदी येऊ शकते. कारण त्याला आयसीसीकडून डीमेरिट पाँइंट्स मिळण्याची शक्यता आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
त्याचे झाले असे की, इंग्लंडचा संघ चौथ्या डावात फलंदाजी करायला उतरला असताना तिसऱ्या दिवसाचे शेवटचे षटक अक्षर पटेल टाकत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जो रूटविरुद्ध पायचीतचे अपील झाले. मात्र पंच नितीन मेनन यांनी रूट नाबाद असल्याचा निर्णय दिला. परंतु भारतीय खेळाडूंनी या निर्णयाविरोधात डीआरएसची मदत घेऊन तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली.
तिसऱ्या पंचांनी रिप्ले पहिला असता, रूटच्या बॅटला चेंडू लागला नव्हता. तसेच बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू स्टंपला लागतं असल्याचेही स्पष्ट होते. मात्र चेंडू लागण्याचा इम्पॅक्टमध्ये अम्पायर्स कॉल असे दाखवले. त्यामुळे मैदानावरच्या पंचांनी रुटला आधीच नाबाद दिल्याने तो नाबाद राहिला.
मात्र डीआरएसच्या या निर्णयावर कोहली नाखुश असल्याचे दिसून आले. त्याने या निर्णयाबद्दल आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. तसेच या निर्णयाबाबत तो काही काळ पंचांशी हुज्जत घालत असल्याचेही दिसून आले. मात्र कोहलीच्या या कृतीमुळे सामनाधिकार्यांकडून त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
या नियमामुळे होऊ शकते कारवाई
आयसीसीच्या नियमांमधील आर्टिकल २.८ नुसार ‘पंचाच्या निर्णयाशी असहमती दर्शवणे’ आणि ‘पंचांच्या निर्णयावर त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा करणे अथवा वाद घालणे’, हे शिक्षेसाठी पात्र आहे. तसेच पंचांचा निर्णय योग्य होता अथवा अयोग्य, हे अशा प्रकरणात महत्वाचे ठरणार नाही, हे देखील या नियमात सांगितले गेले आहे. त्यामुळे या नियमाअंतर्गत कोहलीवर पहिल्या किंवा दुसऱ्या स्तरावरची चूक ग्राह्य धरली जाऊन कारवाई केली जाऊ शकते. ज्यात एक ते चार मधील डीमेरीट गुण त्याच्यावर लावले जाऊ शकतात.
एका कसोटी सामन्याची येऊ शकते बंदी
यापूर्वी गेल्या २४ महिन्यांच्या कालावधीत कोहलीच्या नावावर दोन डीमेरीट गुण जमा आहेत. या सामन्याच्या कृतीमुळे अजून दोन गुण जमा होण्याची देखील शक्यता आहे. असे झाल्यास कोहलीच्या नावे एकूण ४ गुण जमा होतील. आणि अशा परिस्थितीत त्याच्यावर एका कसोटी सामन्याच्या बंदीची देखील कारवाई होऊ शकते.
आयसीसीच्या नियमानुसार जर एखाद्या खेळाडूला २४ महिन्यांच्या कालावधीत ४ डिमिरिट पॉइंट्स मिळाले तर त्याचे रुपांतर सस्पेन्शन पॉइंटमध्ये(suspension points) होते आणि खेळाडूवर बंदी(Ban) घातली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! भारताच्या गुणवान यष्टीरक्षक-फलंदाजाची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
चेन्नईचा सुपर किंग! लाजवाब शतकाने माजी खेळाडूंनीही केला अश्विनला सलाम, ट्विटरवर वाहतोय प्रशंसेचा पूर
चांगली खेळी केल्यानंतरही विराट सापडला वादात,स्टीव्ह स्मिथशी केली तुलना





