भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासून बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. ॲडलेड येथे होणारी ही कसोटी गुलाबी चेंडूने खेळली जाईल. या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी सराव सामना खेळला. मात्र या सामन्यात टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह खेळले नाहीत. आता या मागचं कारण समोर आलं आहे.
वास्तविक, या दोघांनी नेट्समध्ये एकमेकांचा सामना केला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमराह विराट कोहलीला गोलंदाजी करताना दिसतोय. या दरम्यान कोहली पूर्ण लयीत खेळत असल्याचं दिसत आहे. या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या कसोटीतील भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. बुमराहनं सामन्यात 8 बळी घेतले होते, तर कोहलीनं दुसऱ्या डावात शतक ठोकलं होतं.
सराव सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, प्रधानमंत्री एकादश विरुद्ध वेगवान गोलंदाज हर्षित राणानं शानदार कामगिरी करत 4 विकेट घेतल्या. भारतानं रविवारी संघाला 43.2 षटकांत 240 च्या स्कोरवर ऑलआऊट केलं होतं. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता, ज्यानंतर दुसऱ्या दिवशी सामना 46 षटकांचा करण्यात आला.
प्रधानमंत्री एकादशनं भारताला 241 धावांचं लक्ष्य दिलं होतं, हे लक्ष्य टीम इंडियानं 42.5 षटकांत 4 विकेट गमावून गाठलं. संघानं यानंतर संपूर्ण षटकं फलंदाजी केली आणि 46 षटकांत 5 गडी गमावून 257 धावा केल्या. पहिली कसोटी न खेळणारा आर अश्विन सराव सामन्यात देखील खेळला नाही. मात्र त्यानं नेट्समध्ये विराट कोहलीला गोलंदाजी केली. 2020-21 दौऱ्यात ॲडलेड येथे झालेल्या गुलाबी चेंडूच्या कसोटीत अश्विननं 4 बळी घेतले होते.
हेही वाचा –
IND vs AUS; दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11, या खेळाडूंना मिळणार संधी
IPL 2025; या 3 संघांकडे आहेत सर्वात खतरनाक अष्टपैलू खेळाडू!
स्टार खेळाडू पीव्ही सिंधू, लक्ष्य सेनने जेतेपद पटाकावून रचला इतिहास…!