भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 157 धावांची गरज होती. पण सततच्या पावसामुळे पाचव्या दिवशी एकही चेंडू खेळता आला नाही. या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांची कामगिरी जबरदस्त राहिली. जसप्रीत बुमराहने सामन्यात 9 बळी घेतले, तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज देखील उत्कृष्ट लयीत दिसले.
फलंदाजांमध्ये केएल राहुलने सलामीला येत 84 धावांची खेळी खेळली. त्यामुळे पुढील कसोटीसाठी संघात त्याचे स्थान निश्चित झाले आहे. कर्णधार विराट कोहलीही सामन्यानंतर संघाच्या कामगिरीवर खुश दिसत होता आणि त्याने लॉर्ड्सवरील कसोटीसाठी संभाव्य अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल न करण्याचे संकेत दिले आहेत.
उर्वरित कसोटी सामन्यांसाठीच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना कोहली म्हणाला, “शक्यता हीच आहे की हेच संघसंयोजन आमच्यासाठी संपूर्ण मालिकेत आदर्श असेल. पण तरीही संघात सामंजस्य ठेवणे, महत्त्वाचे असेल. तसेच खेळपट्टी आणि परिस्थिती देखील लक्षात घेण्याची गरज आहे. भारत आणि इंग्लंडमधील सामने नेहमीच रोमांचक असतात आम्ही पुढील सामन्यासाठी उत्सुक आहोत”
नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद फेरीच्या गुणप्रणाली अंतर्गत दोन्ही संघांना प्रत्येकी चार गुण मिळाले. खराब हवामानामुळे पहिल्या कसोटी सामन्याच्या संभाव्य 450 षटकांपैकी जवळपास 250 षटकेच टाकता आली. इंग्लंडने भारताला 209 धावांचे लक्ष्य दिले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाहुण्या भारतीय संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एका विकेटसाठी 52 धावा केल्या होत्या.
सामन्यानंतर कोहली म्हणाला, “आम्ही तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पावसाची अपेक्षा करत होतो. पण तो पाचव्या दिवशी आला. अखेरच्या दिवशी खेळताना आणि खेळाडूंना खेळताना बघण्यात मजा आली असती, पण हे वाईट झाले. पाचव्या दिवशी आम्हाला माहित होते की आमच्याकडे विजयाची संधी आहे. आम्ही आमच्या खेळाच्या योग्य लयीत होतो, असे वाटत होते. मालिकेत बढत घेणे महत्त्वाचे होते पण आम्ही पाचवा दिवस पूर्ण करू शकलो नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे.”
“चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 50 धावा करणे महत्त्वाचे होते. आम्हाला बचावात्मक खेळायचे नव्हते. आमच्या आक्रमकतेने आम्हाला पुढे ठेवले. आमच्या गोलंदाजांनी तीन आठवड्यापासून फलंदाजीवर घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. आम्हाला पहिल्या डावात सुमारे 40 धावांच्या आघाडीची अपेक्षा होती. पण 95 धावांची आघाडी मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो आणि या धावा खूप मौल्यवान होत्या,” असेही त्याने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१: चौथ्या जेतेपदासाठी सीएसकेची तयारी सुरू, ऋतुराजसह ‘हे’ शिलेदार पोहोचले चेन्नईत
कोच राहुल द्रविड बनले ‘कन्नड टिचर’, चक्क ब्रिटिश उच्चायुक्ताला दिले धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल
WTC पाँईट टेबल: पहिली कसोटी अनिर्णीत राहिल्याने टीम इंडियाचे ‘मोठे’ नुकसान, वाचा सविस्तर