भारतीय फलंदाज विराट कोहलीने 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरी सामन्यात 50 वे शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकून इतिहास रचला. वनडे फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक शतकांचा विक्रम झाला आहे. त्याच्या या कामगिरीनंतर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे विधान केले आणि म्हटले की, विराट 100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावू शकणार नाही असा विचार केला तर ते मूर्खपणाचे ठरेल.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने 463 वनडे सामन्यांमध्ये 49 शतके झळकावली होती, जी या फॉरमॅटमधील कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वाधिक शतके आहेत. त्याचवेळी विराट कोहली (Virat Kohli) याने केवळ 291 सामन्यांमध्ये ५० शतके करत त्याचा विक्रम मोडला आणि वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला. न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत शतक झळकावून विक्रम करण्याबरोबरच त्याने आपल्या संघाच्या विजयातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
35 वर्षीय विराट कोहली हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची भारतीय फलंदाजाला संधी असल्याचे रवी शास्त्री (Ravi Shashtri) यांना वाटते. माध्यमांशी बोलताना शास्त्री म्हणाले, “सचिन तेंडुलकरने 100 शतके झळकावल्यावर कोणीही त्याच्या जवळ येईल असे कोणाला वाटले होते का?. विराटने 80 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत, त्यापैकी 50 शतके वनडे सामन्यांमध्ये आहेत, ज्यामुळे तो सर्वोच्च आहे. काहीही अशक्य नाही कारण असे खेळाडू जेव्हा शतके ठोकू लागतात तेव्हा ते वेगाने धावा काढतात. त्याच्या पुढच्या 10 डावांमध्ये तुम्ही आणखी पाच शतके पाहू शकता. खेळाचे तीन स्वरूप आहेत आणि तो त्या सर्व स्वरूपांचा एक भाग आहे. त्याच्यात अजून तीन-चार वर्षांचे क्रिकेट आहे.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक 100 शतके आहेत. या विक्रमाच्या सर्वात जवळ विराट कोहली आहे, ज्याच्या नावावर तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 80 शतके आहेत. क्रिकेटच्या देवाच्या या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी विराटला आणखी 20 शतके ठोकावी लागणार आहेत. सध्या विराट जबरदस्त फॉर्ममध्ये असून तो त्याच्या खेळाचा पुरेपूर आनंद घेत आहे. अशा स्थितीत विराट कोहलीच्या कारकिर्दीत क्रिकेटची काही वर्षे बाकी आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. (Virat will break Sachin record of hundred centuries former coach big prediction)
म्हत्वाच्या बातम्या
Semi Final जिंंकल्यानंतर इमोशनल झाले भारतीय खेळाडू, अश्विनने हाताचे चुंबन घेताच शमी म्हणाला, ‘उत्तर देऊन…’
रोहितमुळेच मला खेळता येत नाही! सेमीफायनलमध्ये रिटायर्ड हर्ट झालेल्या गिलची प्रतिक्रिया चर्चेत