टी20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup) मध्ये रविवारी (दि. 6 नोव्हेंबर) भारताने झिम्बाब्वेला पराभूत करत उपांत्य फेरीत धमाकेदार प्रवेश केला. या सामन्यात 2 अंक प्राप्त करत भारताने गुणतालिकेत अव्वल स्थानावर साखळी सामन्यांचा शेवट केला. या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागातील खेळाडूंनी आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडली. मात्र, माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग याने भारतीय संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
टी20 विश्वचषकात बरेच मोठे उलटफेर पाहायला मिळाले. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच दिला. त्यांच्या या विजयामुळे भारताचे उपांंत्य फेरीचे तिकीट पक्के झाले. त्यानंतर भारताने सुपर-12च्या अंतिम सामन्यात झिम्बाब्वेला 71 धावांनी पराभव करत गट-2मध्ये अव्वल स्थान प्राप्त केले. मात्र, या सामन्यानंतर भारतीय संघाच्या व्यवस्थापनावर काही दिग्गजांनी सडकून टीका केली आहे. भारताचा माजी खेळाडू आणि विस्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याने व्यवस्थापनाला चांगलेच खडे बोल सुनावलेे आहेत. त्याने दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ऐवजी रिषभ पंत (Rishabh Pant) याला संघात स्थान दिल्यामुळे संघ व्यवस्थापनाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. त्याच्या मते ,जर तुम्ही कार्तिकला विश्वचषकात खेळण्याची संधी देऊन जुगार खेळलाच आहे तर त्याला सर्व सामन्यांमध्ये खेळवले गेले पाहिजे. त्याला एखाद्या सामन्यात खाली बसवणे त्याच्या विश्वासासाठी चांगली गोष्ट नाही. त्याला सध्या संघाच्या विश्वासाची गरज आहे, कारण त्याने मागच्या सामन्यात कमी धावा केल्या आहेत.
एका माध्यम संस्थेशी बोलताना सेहवाग म्हटला की,”रोहित शर्मा (Rohit Sharma) याने म्हटले आहे की, आपण उपांत्य फेरीसाठी पात्र झालोच आहोत, तर पंतला एका सामन्यात संधी द्यायला पाहिजे. कारण आपण पहिल्यांदा फलंदाजी करत आहोत तर फिनिशरची गरज नाही. आपल्याला फिनिशरची गरज धावसंख्येचा पाठलाग करताना असते. माझ्यामते भारताने झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजी करण्यासाठी सांगीतले पाहिजे होते. कारण रिषभ पंत या परिस्थितीत कसोटी आणि मर्यादित षटकांचे सामने खेळला आहे.” यावर आशिष नेहरा यानेही प्रतिक्रिया दिली की ‘जर रिषभ या सामन्यात चांगला खेळला असता तर पुढच्या साामन्यात संघात रिषभला खेळवणार की कार्तिकला?’
टी20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) ऍडिलेड येथे खेळवला जाईल. या सामन्यात यष्टीरक्षक आणि फिनिशरच्या भूमिकेत कोण खेळताना दिसणार हे पाहण्यासारखे असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे सूर्याबाबत वक्तव्य! म्हणाले, ‘मी असतो तर सूर्यकुमार यादवसारख्या सर्व फलंदाजांना संघात…’
विराटची फिटनेस भारीच, पण दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचने पुढच्या सहा वर्षांसाठी दिला ‘हा’ खास सल्ला