श्रीलंकेचा स्टार ऑलराउंडर, वानिंदू हसरंगा, आज 18 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी20 आशिया कप 2025च्या 11व्या सामन्यात इतिहास रचू शकतो. तो स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनू शकतो. हसरंगाकडे भारताचा दिग्गज गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अफगाणिस्तानचा रशीद खान यांना मागे टाकून टी-20 आशिया कपमध्ये नंबर वन गोलंदाज बनण्याची संधी आहे. हे साध्य करण्यासाठी त्याला फक्त तीन विकेट्सची आवश्यकता आहे.
अफगाणिस्तानचा कर्णधार आणि स्टार स्पिनर, रशीद खान, याच्या नावावर टी-20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. त्याने स्पर्धेत आतापर्यंत 14 विकेट्स घेतल्या आहेत. रशीदने हा विक्रम फक्त दोन दिवसांपूर्वीच मोडला. भुवनेश्वर कुमारने सहा सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. हसरंगाने टी-2 आशिया कपमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत. तीन विकेट्ससह, तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल.
टी-20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
रशिद खान (अफगाणिस्तान) – 10 सामने: 14 विकेट्स
भुवनेश्वर कुमार (भारत) – 6 सामने: 13 विकेट्स
वानिंदू हसरंगा (श्रीलंका) – 8 सामने: 12 विकेट्स
अमजद जावेद (संयुक्त अरब अमिराती) – 7 सामने: 12 विकेट्स
हार्दिक पांड्या (भारत) – 10 सामने: 12 विकेट्स
वानिन्दु हसरंगा हा श्रीलंकेचा नंबर वन टी-20 गोलंदाज आहे. त्याने 81 सामन्यांमध्ये 79 डावांमध्ये श्रीलंकेसाठी 134 विकेट्स घेतल्या आहेत. आता तो टी-20 आशिया कपच्या इतिहासात नंबर वन गोलंदाज होण्याचा विक्रम करू शकतो का हे पाहणे मनोरंजक ठरेल. 2025च्या आशिया कपमधील हसरंगाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये फक्त तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे, सुपर 4 टप्पा सुरू होण्यापूर्वी तो पुन्हा फॉर्म मिळवण्याचा प्रयत्न करेल.
श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे आशिया कप 2025 साठी ग्रुप ए मध्ये आहेत. या ग्रुपमधील कोणताही संघ अद्याप सुपर 4 मध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे, आजचा सामना महत्त्वाचा आहे. श्रीलंकेने आधीच दोन सामने जिंकले आहेत. दरम्यान, सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानला हा सामना जिंकावा लागेल.






