यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान टी२० विश्वचषकाचा थरार संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे रंगणार आहे. या स्पर्धेसाठी संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. याचवेळी या स्पर्धेसाठी भारतीय संघातही जागा मिळवण्याच्या दृष्टीने अनेक खेळाडूंमध्ये चढाओढ आहे. त्यातही अनेक फिरकीपटूंमध्येही शर्यत असल्याचे दिसत आहे. या शर्यतीत अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलही आहे. याचबद्दल त्याने नुकतेच आपले मत मांडले आहे.
चहल सध्या भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघासह श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे. नुकताच २५ जुलैला भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिला टी२० सामना जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. या विजयानंतर चहलने टी२० विश्वचषकासाठी खेळाडूंमध्ये असलेल्या स्पर्धेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तो म्हणाला, ‘नक्कीच ही चांगली स्पर्धा आहे. जर तुमच्याकडे ३० खेळाडूंंचा गट आहे, तर नक्कीच सर्व चांगले खेळाडू आहेत. सर्व फिरकीपटू चांगली कामगिरी करत आहेत. एक फिरकीपटू म्हणून आम्हाला माहित आहे की कमीत कमी दोन फिरकीपटू सध्या तयार आहेत, ज्यांनी इथे आणि आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन केले आहे.’
चहल पुढे म्हणाला, ‘मी प्रत्येक संधीचा फायदा घेत चांगली कामगिकी करणे, एवढंच करु शकतो. जर तुम्ही चांगली कामगिरी केली, तर तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल आणि चांगली कामगिरी केली नाही, तर मी असो किंवा अन्य कोणी, तुम्हाला बाहेर बसावेच लागेल.’
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा चहल म्हणाला, ‘म्हणूनच मी जेव्हाही चेंडू माझ्या हातात असतो, तेव्हा दुसऱ्यांबद्दल विचार करत नाही, केवळ आपल्या खेळावर लक्ष देतो.’
याबरोबरच चहलने लॉकडाऊन दरम्यान त्याचे काय रुटीन होते, याबद्दलही खूलासा केला आहे. त्याने सांगितले की ‘जेव्हा मी खेळत नव्हतो, तेव्हा मी माझ्या गोलंदाजी प्रशिक्षकांबरोबर कठोर मेहनत घेतली. मला जाणून घ्यायचे होते की मी काही सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन का करु शकलो नाही. त्यामुळे मी लॉकडाऊनदरम्यान या गोष्टींवर लक्ष दिले.’
तसेच चहलने सांगितले की ‘मी माझ्या मित्रांसह सराव केला, ज्यामुळे मला कुठे गोलंदाजी करायची हे समजेल. याप्रकारची गोलंदाजी माझी मजबूती आहे. मी श्रीलंका दौऱ्यावर येण्यापूर्वी स्वत:ला सांगितले की मी चांगले करु शकतो. मी लॉकडाऊनदरम्यान माझ्या गोलंदाजीवर लक्ष दिले, पण मी खूप बदल करु इच्छित नव्हतो. मी भारत अरुण, पारस महाम्ब्रे आणि राहुल द्रविड यांच्याबरोबर गोलंदाजीबद्दल चर्चा केली. मी स्वत:चे व्हिडिओ देखील पाहिले.’
याशिवाय चहलने सांगितले की त्याने जयंत यादवबरोबरही सराव केला.
महत्त्वाच्या बातम्या –
महिला हॉकी सामन्यात जर्मनीने भारताला पाजलं पराभवाचं पाणी; बुधवारी ब्रिटनला देणार आव्हान
भुवनेश्वर नाही ‘हा’ खेळाडू हवा होता सामनावीर, दोन भारतीय दिग्गजांनी व्यक्त केले मत