टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील पदकाची अपेक्षा होती. मात्र तिचं पदक थोडक्यात हुकलं. मीराबाईला क्लीन अँड जर्कच्या शेवटच्या प्रयत्नात 114 किलो वजन उचलता आलं नाही.
8 ऑगस्ट म्हणजेच आज मीराबाईचा वाढदिवस (30) आहे. त्यादिवशी तिच्याकडे इतिहास रचण्याची संधी होती. स्पर्धा संपल्यानंतर मीराबाईनं सांगितलं की, आज तिच्या मासिक पाळीचा तिसरा दिवस होता, त्यामुळे तिला वजन उचलणं कठीण गेलं. मीराबाई म्हणाली, “मी आजच्या कामगिरीनं खूप खूश आहे. दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत माझी काय अवस्था झाली होती, हे सर्वांना माहीत आहे. त्यानंतर मी 4-5 महिन्यांसाठी ट्रिटमेंटला गेली. पॅरिस ऑलिम्पिकसाठी माझ्याकडे खूप कमी वेळ होता. मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न केले, पण ते होऊ शकलं नाही.”
मीराबाई पुढे म्हणाली, “आज माझं नशीबही खराब होतं. आज माझी मासिक पाळी होती. माझ्या मासिक पाळीचा आज तिसरा दिवस होता. जेव्हा मी शेवटच्या ऑलिम्पिकमध्ये खेळत होते, तेव्हाही माझ्या मासिक पाळीचा दुसरा दिवस होता. मी माझ्या परीनं सर्व प्रयत्न केले. परंतु यावेळी मी पदक जिंकू न शकल्याबद्दल सर्वांची माफी मागते”.
मीराबाई आज (8 ऑगस्ट) 30 वर्षांची झाली आहे. तिनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 49 किलो वजनी गटात भाग घेतला होता. स्नॅच फेरीत मीराबाईनं उत्कृष्ट कामगिरी केली होती. या फेरीनंतर ती तिसऱ्या स्थानी होती. या फेरीत तिनं 88 किलो वजन उचललं होतं. यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण इथे तिनं निराशा केली.
क्लीन अँड जर्कच्या पहिल्या प्रयत्नात मीराबाईनं 111 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती अयशस्वी ठरली. यानंतर तिनं लगेचच दुसऱ्या प्रयत्नात 111 किलो वजन उचललं आणि पदकासाठी दावा ठोकला. यानंतर क्लीन अँड जर्कच्या तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात तिनं 114 किलो वजन उचलण्याचा निर्णय घेतला. पण ती यशस्वी झाली नाही आणि चौथ्या स्थानावर राहिली.
मीराबाईकडे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून इतिहास रचण्याची संधी होती. ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरू शकली असती. तिच्या आधी कर्णम मल्लेश्वरीनं 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. मीराबाई चानूनं गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकलं होतं.
हेही वाचा –
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, ‘विनेश फोगट’ला मिळणार या सर्व सुविधा, जाणून घ्या
पॅरिस ऑलिम्पिक वादाच्या भोवऱ्यात; शिस्तभंग केल्याप्रकरणी भारतीय खेळाडूंची हकालपट्टी
“तू हरली नाहीस.. तूला हरवलं..”, विनेश फोगटच्या निवृत्तीनंतर बजरंग पुनियाचे मोठे वक्तव्य