जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या सोळाव्या हंगामात आपले पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघ प्रयत्नशील असेल. मात्र स्पर्धा सुरू होण्यासाठी आता अवघ्या 15 दिवसांचा अवधी शिल्लक असताना संघाचा एक प्रमुख अष्टपैलू संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे.
आरसीबीने यावर्षी आयपीएल लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स याला आपल्या संघात सामील करून घेतले होते. यासाठी आरसीबीने तब्बल 3 कोटी 20 लाख अशी तगडी रक्कम मोजली. जॅक्स हा इंग्लंड संघासह बांगलादेश दौऱ्यावर होता. उभय संघातील पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये तो सहभागी झालेला. तिसऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या सराव सत्रात त्याच्या मांडीला दुखापत झाली. त्या कारणाने त्याने दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला. त्यानंतर आता तो या दुखापतीमुळे जवळपास दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.
आरसीबीने मोठी रक्कम खर्च करत त्याला आपल्या संघात स्थान दिलेले. ग्लेन मॅक्सवेलचा पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. परंतु, आता तो हंगामातून बाहेर गेल्याने संघाच्या योजनांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्याच्याजागी न्यूझीलंडचा अष्टपैलू मायकेल ब्रेसवेल याच्याशी आरसीबी संघ व्यवस्थापन चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. ब्रेसवेल याने भारत दौऱ्यावर शानदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले.
विल जॅक्स हा टी20 चा एक आदर्श क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास दिसून येते की, त्याने 109 सामने खेळताना 157 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 2802 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावे 26 बळीही जमा आहेत. नुकत्याच झालेल्या एसए टी20 लीगमध्ये त्याने आपला हा शानदार फॉर्म कायम राहताना दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. त्याच्या योगदानामुळे प्रिटोरिया कॅपिटल्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान बनवण्यात यशस्वी ठरलेला.
(Will Jacks Ruled Out From IPL 2023 RCB Talking With Michael Bracewell As Replacement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ट्विटरवर अडचणीत सापडला अश्विन! थेट एलॉन मस्कला टॅग करत मागितला सल्ला, नक्की काय घडलंय वाचाच
महिला कुस्तीपटूंसाठी खूशखबर! ‘या’ तारखेला रंगणार पहिल्या ‘महिला महाराष्ट्र केसरी’चा थरार