आयपीएल (IPL) २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांपूर्वी एक चांगली बातमी समोर येत आहे. मीडियातील काही वृत्तांनुसार, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदानावर जाऊन सामना पाहण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याशिवाय टी -२० विश्वचषकातही चाहत्यांना परवानगी दिली जाईल.
इनसाइडस्पोर्ट्सने दिलेल्या बातमीनुसार, गल्फ न्यूजशी बोलताना एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे सरचिटणीस मुबाशीर उस्मानी म्हणाले की, “बोर्ड याबाबत अधिकाऱ्यांशी बोलून त्याची परवानगी घेईल. यानंतर बीसीसीआय आणि आयसीसीशी चर्चा केली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल.”
ते म्हणाले, “यजमान म्हणून ईसीबी सतत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करेल की, चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याच्या मंजुरीसाठी कोणत्या प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. त्यानंतर आम्ही बीसीसीआय आणि आयसीसीशी त्यांना काय हवे आहे याबद्दल बोलू. आम्हाला ते हवे आहे. एमिरेट्समधील क्रिकेट चाहत्यांना मैदानावर जाऊन सामना पाहण्याची संधी मिळाली पाहिजे.”
आयपीएल २०२१ यूएईमध्ये होणार आहे
आयपीएल २०२१ चे उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जातील. गेल्या वर्षी देखील आयपीएल यूएईमध्येच आयोजित करण्यात आली होती आणि ती खूप यशस्वी झाली होती. त्याचबरोबर आयपीएलनंतर टी -२० विश्वचषक देखील यूएईमध्येच आयोजित केला जाईल. या दोन्ही स्पर्धा बीसीसीआय आणि ईसीबीद्वारे संयुक्तपणे आयोजित केल्या जातील.
आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा भारतात प्रेक्षकांविना खेळला गेला. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे काही सामने पुढे ढकलण्यात आले आणि नंतर ते यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने होईल आणि हा सामना दुबईत खेळला जाईल. साखळी फेरीतील सामने ८ ऑक्टोबरपर्यंत संपतील. यानंतर, प्लेऑफचे सामने १० ऑक्टोबरपासून सुरू होतील आणि स्पर्धेचा शेवट १५ ऑक्टोबर रोजी अंतिम सामन्याने होईल.
दुबई, अबू धाबी आणि शारजाहच्या मैदानावर एकूण ३१ सामने खेळले जातील. अंतिम सामन्यासह एकूण १३ सामने दुबईमध्ये खेळले जातील. अबुधाबीमध्ये ८ सामने आणि शारजाहमध्ये १० सामने खेळले जातील.
महत्त्वाच्या बातम्या-
–कोरोना निगेटिव्ह आलेला पंड्या परतला भारतात, पण ‘हे’ दोन क्रिकेटर अडकले श्रीलंकेत
–बटलर बाद होण्यापूर्वी विराटने केली होती भविष्यवाणी; पुढील चेंडूवरच झाला असा गेम, पाहा व्हिडिओ