भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या फलंदाजीचा मुख्य स्तंभ आहे. त्याने दमदार फलंदाजी करताना अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच तो सध्या आयसीसीच्या वनडे, कसोटी आणि टी -२० फलंदाजांच्या यादीत टॉप ५ फलंदाजांमध्ये आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक मानांकित पुरस्कारही जिंकले आहेत. आता त्याचे नाव आणखी एका पुरस्कारासाठी जाहीर झाले आहे.
विराट कोहलीची विस्डन मॅगझिनने मागच्या दशकातील म्हणजेच २०१०च्या दशकातील सर्वोत्कृष्ट वनडे फलंदाज म्हणून निवड केली आहे. कोहलीने २००८ साली भारतीय वनडे संघात पदार्पण केले होते. कोहलीने आतापर्यंत एकूण २५४ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने १२,१६९ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने ४३ शतकं आणि ६२ अर्धशतकं केले आहेत.
क्रिकेट इतिहासातील पहिला वनडे आंतरराष्ट्रीय सामना खेळवून ५० वर्ष पूर्ण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विस्डेनने २०२१ मध्ये गेल्या ५ दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंची निवड केली आहे. त्यानुसार २०१० दशकासाठी कोहलीची सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे.
सचिन, कपिल यांचाही गौरव
विराट कोहलीसह, सचिन तेंडुलकरची देखील १९९० च्या दशकातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा देखील या यादीत समावेश आहे. १९८० च्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा मान कपिल देव यांना मिळाला आहे. सचिनने १९९८ साली तब्बल ९ वनडे शतके ठोकली होती. तर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यांनी १९८० च्या दशकात सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच १९७० च्या दशकासाठी सर विव रिचर्ड्स आणि २००० च्या दशकासाठी मुथय्या मुरलीधरन यांना सर्वोत्तम क्रिकेटूचा मान मिळाला आहे.
बेन स्टोक्स सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम क्रिकेटपटू
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून विस्डेनने घोषित केले आहे. स्टोक्स गेल्या काही वर्षांपासून इंग्लंड संघासाठी शानदार अष्टपैलू कामगिरी करत आहे. त्याने इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक २०१९ स्पर्धेत इंग्लंड संघाला विश्वविजेता बनवण्यात मोठी भूमिका पार पाडली होती. तसेच २०१९ सालच्या ऍशेस मालिकेतही त्यांची कामगिरी महत्त्वाची ठरली होती.
तसेच ऑस्ट्रेलियन संघाची महिला क्रिकेटपटू बेथ मूनी हिला वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला आहे. यासोबतच कायरन पोलार्डला वर्षातील सर्वोत्तम टी२० क्रिकेटपटू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. याबरोबरच डोम सिबली, जॅक क्राॅली, जेसन होल्डर, मोहम्मद रिजवान आणि डॅरेन स्टीवन्स यांची २०२१ वर्षासाठी विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआय अध्यक्षपदी कायम राहणार का सुट्टी होणार? ‘दादा’च्या भविष्याचा आज होणार निर्णय
दोन नवे कर्णधार आज आमने सामने; ‘अशी’ असेल दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सची प्लेइंग XI
आश्चर्यच आहे! आयपीएल इतिहासात आरसीबीने ‘एवढ्या’ वर्षानंतर केला १५० पेक्षा कमी धावांचा बचाव