विश्वचषक 2023 स्पर्धेत सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) 146 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात कधीच न घडलेली घटना घडली. ते म्हणजे एखादा फलंदाज चक्क टाईम आऊट पद्धतीने बाद झाला. टाईम आऊटच्या नियमानुसार, विकेट पडल्यानंतर निर्धारित वेळेत क्रीजवर येणारा फलंदाज पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार नसेल, तर त्याला बाद दिले जाऊ शकते. असेच काहीसे बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेल्या स्पर्धेच्या 38व्या सामन्यात घडले. श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट होणारा क्रिकेट इतिहासातील पहिलाच क्रिकेटपटू बनला.
आयसीसीच्या नियम 40.1.1 नुसार, खेळाडूला 2 मिनिटाच्या आत क्रीजवर येऊन चेंडू खेळण्यासाठी तयार व्हावे लागते. मात्र, अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) हा 1.50 मिनिटालाच तयार झाला होता. मात्र, त्याचवेळी त्याच्या हेल्मेटची पट्टी तुटली. त्यामुळे त्याने दुसरे हेल्मेट मागवले. या सर्वांमध्ये झालेल्या विलंबाचा फायदा घेत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने पंचांकडे अपील केली आणि त्यामुळे पंचांनाही मॅथ्यूजला बाद घोषित करावे लागले.
मॅथ्यूजने काढला राग
सामना संपल्यानंतरही मॅथ्यूज वादग्रस्तपद्धतीने बाद होणे विसरला नाही. त्याने पत्रकार परिषदेत बांगलादेशचा कर्णधार शाकिबवर निशाणा साधला. तो म्हणाला, “या सामन्यापूर्वी माझ्या मनात शाकिबविषयी खूपच आदर होता, पण आज त्याने सर्वकाही गमावले आहे. मी काहीही चुकीचे केले नव्हते. माझ्याकडे क्रीजवर जाऊन तयार होण्यासाठी 2 मिनिटे होती, जे मी केले. मात्र, माझे हेल्मेट खराब झाले आणि त्यानंतर माहिती नाही, त्याच्या व्यावहारिक बुद्धीला काय झाले? निश्चितच हे शाकिब आणि बांगलादेशसाठी लज्जास्पद आहे. जर तुम्हाला इतक्या खालच्या पातळीवर जाऊन क्रिकेट खेळायचे असेल, तर मला वाटते की, हे खूपच चुकीचे होत आहे.”
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1721578089086677249
यावेळी तो असेही म्हणाला की, “असे बांगलादेशमुळेच घडले, मला वाटत नाही की, इतर कोणत्याही संघाने असे केले असेल.”
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1721578751581114759
पुढे पंचांविषयी बोलताना मॅथ्यूज असे म्हणाला की, “नियमांनुसार, मी निश्चित वेळेच्या आत खेळण्यासाठी तयार होतो, आणि जेव्हा माझे हेल्मेट तुटले, तेव्हाही माझ्याकडे 5 सेकंद शिल्लक होते. मात्र, पंचांनी प्रशिक्षकांना म्हटले की, त्यांना माझे हेल्मेट तुटल्याचे माहिती नव्हते. खरं तर, तेव्हा मी हात वर करून हेल्मेट मागवत होतो. हे खूपच लज्जास्पद आहे.”
यादरम्यान एका पत्रकाराने मॅथ्यूजला विचारले की, तू बांगलादेश संघाच्या खिलाडूवृत्तीविषयी बोलत आहेस, पण तुझ्या खिलाडूवृत्तीचे काय? कारण, तुमच्या संघाने सामन्यानंतर बांगलादेश संघाशी हातमिळवणी केली नाही. या प्रश्नाचे उत्तर देताना मॅथ्यूज म्हणाला, “तुम्ही त्यांचा आदर करता, जे तुमचा आदर करतात. त्यांनी या खेळाचा आदर केला पाहिजे. पंचांसह आम्ही सर्व या खेळाचे नायक आहोत, तेव्हा तुम्ही आदर केला नाही आणि व्यावहारिक बुद्धीचा वापर केला नाही, तर तुम्ही कुणाशी काय अपेक्षा ठेवू शकता.”
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1721590331677044946
सामन्याचा आढावा
या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने 49.3 षटकात सर्व विकेट्स गमावत 279 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाने 41.1 षटकात 7 विकेट्स गमावत 282 धावा करत 3 विकेट्सने सामना जिंकला. (world cup 2023 angelo mathews lashes out shakib al hasan and bangladesh team for timed out)
हेही वाचा-
असा घेतला बदला! थेट हातातलं घड्याळ दाखवत मेथ्थ्यूने शाकिबला दाखवला रस्ता
काय आहे टाईम आऊट नियम, ज्यात दिग्गज अँजेलो मॅथ्यूजही फसला; वाचा सविस्तर
मॅथ्यूज ‘या’ पद्धतीने बाद होताच अंपायरशी भिडला, मैदानाबाहेर जाताना रागात फेकलं हेल्मेट; Video तुफान व्हायरल