वनडे विश्वचषक 2023 अभियानाची सुरुवात भारतीय संघाने दिमाखात केली. आपल्या पहिल्याच सामन्यात जगप्रसिद्ध विस्फोटक खेळाडूंनी भरलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताच्या या विजयाचे हिरो विराट कोहली आणि केएल राहुल ठरले. जगभरातील क्रिकेटप्रेमींनी आणि आजी-माजी क्रिकेटपटूंनी भारताच्या विजयावर प्रतिक्रिया दिल्या. मात्र, विराट कोहलीची बहीण भावना हिने लिहिलेला खास संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
झालं असं की, ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी 49.3 षटकात 10 विकेट्स गमावत फक्त 199 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताने पहिल्या तिन्ही विकेट्स 2 धावांवर गमावल्या होत्या. यात इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना शून्यावर विकेट गमवावी लागली होती. त्यावेळी विराट कोहली आणि केएल राहुल (Virat Kohli And KL Rahul) यांनी टिच्चून फलंदाजी करत भारताचा डाव सावरला.
राहुलसोबत मिळून सावरला डाव
विराट कोहली (Virat Kohli) याने या सामन्यात 116 चेंडूंचा सामना करताना 85 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 6 चौकार लागले. विराटने राहुलसोबत 165 धावांची भागीदारी केली होती. राहुलने या सामन्यात नाबाद 97 धावांचे योगदान दिले होते.
विराटसाठी बहिणीची खास पोस्ट
विराटच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रदर्शनानंतर भावना कोहली (Bhawna Kohli) हिने इंस्टाग्रामवरून हृदयस्पर्शी मेसेज लिहिला. भावनाने सामना खेळत असलेल्या विराटचा टीव्हीवरील एक फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करत तिने फोटोवर लिहिले की, “तू एक विजेता आहेस.” यासोबतच तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले की, “विश्वचषकातील पहिला विजय. काय खेळलात तुम्ही. विराट आणि केएल राहुलची भन्नाट खेळी.”
भारतीय फिरकीपटूंचा जलवा
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 199 धावांवर रोखण्यात भारतीय फिरकी त्रिकुटाने सिंहाचा वाटा उचलला. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकत गेले. यावेळी भारताकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 3, तर कुलदीप यादव आणि अश्विन यांनी अनुक्रमे 2 आणि 1 विकेट घेतली. तसेच, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 2, तर मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या यांनीही प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
भारताचा पुढील सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतापुढे अफगाणिस्तान संघाचे आव्हान आहे. भारतीय संघ हा सामनाही जिंकून आपली विजयी मालिका सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल. (world cup 2023 cricketer virat kohli sister bhawana heart touching message for him after india win over australia)
हेही वाचा-
जाळ अन् धूर संगटच! मेंडिसने लंकेकडून पाकिस्तानविरुद्ध ठोकले वर्ल्डकपमधील वेगवान शतक, फक्त…
टोप्ली पुढे बांगलादेशची टॉप ऑर्डर गुडघ्यावर! तीनच षटकात केली वाताहात