भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ बहुप्रतिक्षित विश्वचषक 2023 अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) उभय संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने याने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी कोणताही बदल केला नाहीये.
स्पर्धेत भारताचं पारडं जड
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत भारतीय संघ (Team India) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या स्पर्धेत भारताचं पारडं जड राहिलं आहे. भारताने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. यादरम्यान भारताने इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढ्य संघांना पराभवाचा धक्का देत विजयीरथ सुरू ठेवला. भारताने स्पर्धेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाने केली होती. आता स्पर्धेचा शेवटदेखील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ 2003 विश्वचषकाचा बदला घेण्याचा प्रयत्न तर करेलच, पण त्यासोबतच तिसऱ्यांदा वनडे विश्वचषकाचा किताब नावावर करण्याचाही प्रयत्न करेल.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. मात्र, त्यांना पहिले दोन सामने गमवावे लागले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी पुढील सलग आठही सामने खिशात घातले. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाला स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध 6 विकेट्सने पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 134 धावांचा पराभव पत्करावा लागला. अशात 5 वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघ सहावा किताबही आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.
विश्वचषक 2023 अंतिम सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया
ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड (World Cup 2023 IND vs AUS final Toss See playing XI Here)
हेही वाचा-
IND vs AUS: Finalपूर्वी शुबमन गिलच्या आजीची आपल्या पतीला ताकीद; म्हणाल्या, ‘एकदा मॅच चालू झाली की…’
चॅम्पियन भारतच! World Cup Final साठी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन्सचीही टीम इंडियाला पसंती