ऑस्ट्रेलिया संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. स्पर्धेत धमाकेदार सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाला शनिवारी (दि. 28 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियापुढे गुडघे टेकावे लागले. या सामन्यात चौकार-षटकारांची बरसात पाहायला मिळाली. हा मोठ्या धावसंख्येचा सामना राहिला. मात्र, न्यूझीलंड संघाला 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, सामना गमावूनही न्यूझीलंडने खास विक्रम नावावर केला.
ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 388 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड (New Zealand) संघ 9 विकेट्स गमावत 383 धावाच करू शकला. न्यूझीलंडपुढे या सामन्यात एक मोठे आव्हान होते. मोठी धावसंख्या उभारूनही ऑस्ट्रेलियाला विजयासाठी संघर्ष करावा लागला.
न्यूझीलंडने केल्या पराभवाच्या सामन्यात सर्वाधिक धावा
न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र याने 89 चेंडूत 116 धावा केल्या. अखेरच्या षटकात जेम्स नीशम याने 39 चेंडूत 58 धावा करत संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र, नीशम अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर धावबाद झाला. त्यामुळे सामना न्यूझीलंडच्या हातून निसटला. यानंतर न्यूझीलंड संघ विश्वचषकात पराभूत झालेल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा संघ बनला. यापूर्वी हा विक्रम श्रीलंका संघाच्या नावावर होता. त्यांनी एका पराभूत झालेल्या सामन्यात 344 धावा केल्या होत्या.
विश्वचषकात पराभूत झालेल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारे संघ
383/9 – न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2023*
344/9 – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, 2023
334/9 – इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, 2019
333/8 – बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2019
327/8 – इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, 2011
डेविड वॉर्नर- ट्रेविस हेडची शानदार भागीदारी
ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) आणि दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या ट्रेविस हेड (Travis Head) याने सामन्यात शानदार फलंदाजी केली. हेडने 67 चेंडूत 109 धावांनी शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 7 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. तसेच, शानदार लयीत असलेल्या वॉर्नरने 65 चेंडूत 81 धावांची झंझावाती खेळी केली. वॉर्नरने यादरम्यान 5 चौकार आणि 6 षटकारांची बरसात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 117 चेंडूत 175 धावांची भागीदारी झाली.
या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 771 धावा केल्या. हा विश्वचषकातील कोणत्याही सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम विश्वचषक 2023 स्पर्धेत दक्षिण आफ्रिका (428) आणि श्रीलंका (326) संघातील चौथ्या सामन्यात 7 ऑक्टोबर रोजी झाला होता. या सामन्यात 754 धावांचा पाऊस पडला होता. (world cup 2023 new zealand scoring the highest score in a losing odi world cup match)
हेही वाचा-
‘बाबरचा फोन उचलत नाही PCB अध्यक्ष…’, पाकिस्तानी माजी कर्णधाराचा खळबळजनक दावा
‘हार्दिक येईपर्यंत आमचा त्याच्यावरच विश्वास…’, KL Rahulचे टीम इंडियातील ‘या’ खेळाडूविषयी मोठे भाष्य