India World Test Championship Scenarios: आगामी कसोटी हंगाम भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेने या हंगामाची सुरुवात होईल आणि ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीने संपेल. यानंतर, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 11 जूनपासून लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन येथे खेळवला जाईल. गतवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानी राहणारे संघ अंतिम सामन्यात आमनेसामने असतील.
जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 सायकलमध्ये भारत सध्या 68.52 च्या विजयी टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ 62.5 टक्केसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा संघ 50 च्या विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के करण्यासाठी भारताला आगामी 10 कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
भारतासाठी कसे आहे गणित?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, भारताला विजयाची टक्केवारी 60% च्या वर ठेवण्यासाठी संघाला पुढील 10 पैकी किमान 7 सामने जिंकावे लागतील. त्यादृष्टीने भारतासाठी बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि न्यूझीलंडविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका खूप महत्त्वाची असेल. या पाच सामन्यांतील विजयामुळे भारताची गुणतालिकेतील स्थिती मजबूत होईल.
यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे, जिथे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी अंतर्गत पाच कसोटी सामने खेळवले जातील. भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलियातच ऑस्ट्रेलियन संघाला शेवटच्या दोन कसोटी मालिकेत पराभूत केले आहे, त्यामुळे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवेळी भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला असेल. परिणामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत किमान दोन सामने जिंकण्याची अपेक्षा आहे. जर भारताने घरच्या मैदानावरील सर्व 5 सामने आणि ऑस्ट्रेलियातील कमीत कमी2 सामने जिंकले तर ते गुणतालिकेत सध्याचे अव्वल स्थान कायम ठेवू शकतील.
मात्र, अव्वल दोनमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताला किमान 5 विजय आणि 1 ड्रॉ आवश्यक आहे. भारताने 6 विजय नोंदविल्यास, त्यांची विजयाची टक्केवारी 64.03% होईल, ज्यामुळे संघ अंतिम फेरीत पोहोचेल हे जवळपास निश्चित होईल.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची स्थिती
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला 7 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान निश्चित करण्यासाठी 47 गुणांची आवश्यकता आहे, जे चार विजय किंवा तीन विजय आणि एका ड्रॉ सामन्याद्वारे मिळवू शकतात. दुसरीकडे, न्यूझीलंडचे 8 सामने बाकी आहेत. त्याना 60% विजयाची टक्केवारी गाठण्यासाठी 6 विजय किंवा 5 विजय आणि 1 ड्रॉ असा निकाल आवश्यक आहे.
हेही वाचा –
आधी मार खाल्ला, मग वचपा काढला; दुलीप ट्रॉफी सामन्यादरम्यान रियान आणि अर्शदीपमध्ये खडाजंगी
INDvsBAN : कानपूरमध्ये कसोटी आयोजित करण्यावरुन बीसीसीआयला धमकी, बदलणार दुसऱ्या सामन्याचे ठिकाण?
अजब क्रिकेटपटू! वडील एका देशासाठी खेळले, जन्म दुसऱ्या देशात झाला, कसोटी पदार्पण तिसऱ्याच देशासाठी!