साउथँम्पटन। आज(5 जून) आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा या विश्वचषकातील तिसरा सामना आहे. हा सामना साउथँम्पटनमध्ये रोज बॉल स्टेडीयमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल.
या सामन्याच्या पुर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने साउथँम्पटनमधील परिस्थिती पाहता तीन वेगवान गोलंदाजांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली आहे.
असे झाल्यास भारतीय संघ जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसह भुवनेश्वर कुमारलाही या सामन्यासाठी अंतिम 11 मध्ये सामील करु शकतात. तसेच या वेगवान गोलंदाजांना साथ देण्यासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्या असेल.
त्याचबरोबर विराटने केदार जाधवही खांद्याच्या दुखापतीतून पुर्ण सावरला असून या सामन्याच्या निवडीसाठी उपलब्ध असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे भारतीय संघ केदार किंवा रविंद्र जडेजा यांच्यापैकी कोणाला संधी देणार हे पहावे लागेल.
जडेजाने विश्वचषकाआधी झालेल्या दोन्ही सराव सामन्यात चांगली अष्टपैलू कामगिरी केली होती. तसेच त्याची क्षेत्ररक्षणातील कामगिरी महत्त्वाची ठरते.
सलामीला रोहित शर्मा आणि शिखर धवन ही अनुभवी जोडी उतरेल. तर मधल्या फळीत विराट कोहलीसह केएल राहुल, एमएस धोनी असतील. त्याचबरोबर तळातली फलंदाजी पंड्या सांभाळू शकतो.
जर तीन वेगवान गोलंदाज खेळवले तर फिरकी गोलंदाजीसाठी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल पैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. तसेच केदार किंवा जडेजा यांच्यापैकी ज्याला संधी मिळेल तो फिरकी गोलंदाजीसाठी दुसरा पर्याय असेल.
या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन खांद्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. तर लुंगी एन्गिडीही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे हा सामना खेळणार नाही.
तसेच त्यांचा अनुभवी सलामीवीर फलंदाज हाशिम अमला या सामन्यात अंतिम 11 जणांमध्ये पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. तो इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात डोक्याला चेंडू लागल्याने बांगलादेश विरुद्ध खेळला नव्हता.
आजच्या सामन्यासाठी असे असू शकतात संभाव्य संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिका – फाफ डु प्लेसिस, क्विंटॉन डी कॉक, हाशिम आमला, एडन मार्करम, डेविड मिलर, जेपी ड्यूमिनी, रस्सी वॅन दर दसन, अँडील फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, इम्रान ताहिर, ड्वेन प्रीटोरियस.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज गोलंदाज म्हणतो, धोनी भारतासाठी महत्त्वाचा घटक…
–विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेला धक्का; डेल स्टेन विश्वचषकातून बाहेर, या खेळाडूला मिळाली संधी
–या दिग्गज फुटबॉलपटूने भारताची जर्सी घालून कर्णधार कोहलीला दिल्या विश्वचषकासाठी खास शुभेच्छा