वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्यातून 21 वर्षीय फलंदाज यशस्वी जयसवाल याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. ही संधी जयसवालने दोन्ही हाताने उचलली आणि तिचं सोनं करून दाखवलं. या सामन्यात जयसवालने 200हून अधिक चेंडूंचा सामना करत शतक झळकावले. पुढे त्याने याच शतकाचे दीडशतकामध्ये रूपांतर केले आणि सामनावीर पुरस्कारही पटकावला. विशेष म्हणजे, कसोटी पदार्पण करताना परदेशात संघाच्या विजयात शतक झळकावल्यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. त्याने भारतासाठी 47 वर्षांनंतर अशी कामगिरी केली.
जयसवालचा शानदार विक्रम
डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) भारताच्या पहिल्या डावात सलामीला उतरला होता. त्याने यावेळी कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत 229 धावांची द्विशतकी भागीदारी रचली. यामध्ये रोहितच्या 103 धावांचा समावेश होता. तसेच, जयसवालने 110 धावांचा समावेश होता. त्याने 215 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. रोहितची विकेट पडल्यानंतर जयसवालने एका बाजूने खिंड लढवत संघाच्या धावसंख्येत भर घातली. त्याने सामन्यादरम्यान एकूण 387 चेंडूंचा सामना करत 171 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 16 चौकारांचा पाऊस पाडला. यासह त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
कसोटी पदार्पण करताना परदेशात संघाने मिळवलेल्या विजयात शतक ठोकणारा जयसवाल दुसराच भारतीय खेळाडू बनला. त्याच्यापूर्वी 1976 मध्ये सुरिंदर अमरनाथ (Surinder Amarnath) यांनीही परदेशात कसोटी पदार्पण करताना भारताच्या विजयात शतक झळकावले होते. त्यांनी 1 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने 124 धावा केल्या होत्या.
कसोटी पदार्पण करताना परदेशात संघाच्या विजयात शतक करणारे भारतीय
124 धावा- सुरिंदर अमरनाथ, विरुद्ध- न्यूझीलंड (1976)
171 धावा- यशस्वी जयसवाल, विरुद्ध- वेस्ट इंडिज (2023)*
भारताचा 1 डाव आणि 141 धावांनी विजय
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद फक्त 150 धावा केल्या होत्या. यामध्ये भारतीय गोलंदाज आर अश्विन याने 5, रवींद्र जडेजा याने 3, तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. त्यानंतर भारताने पहिला डाव 5 विकेट्स गमावत 421 धावांवर डाव घोषित केला. यामध्ये जयसवाल (171) आणि रोहित (103) यांच्याव्यतिरिक्त विराट कोहली (76), रवींद्र जडेजा (नाबाद 37) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. यावेळी यजमानांच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताने दिलेल्या 272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने नांग्या टाकल्या. त्यांच्या संपूर्ण संघाचा डाव 130 धावांवर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. यामध्ये अश्विनच्या 7 विकेट्स, जडेजाच्या 2 आणि सिराजच्या 1 विकेटचा समावेश होता. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला. यशस्वी जयसवालला 171 धावांसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (Yashasvi Jaiswal 2nd Indian to score century on Test debut in away win)
महत्वाच्या बातम्या-
विंडीजच्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या यशस्वीचा जबरदस्त विक्रम, रोहित-धवनसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील
पहिला कसोटी जिंकताच रोहितचा आनंद गगनात मावेना; म्हणाला, ‘आम्हाला माहिती होतं, एकदाच…’