कोरोना व्हायरसमुळे ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वे संघात होणारी ३ सामन्यांची वनडे मालिका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती स्वत: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वे (Australia vs Zimbabwe) संघातील पहिला वनडे सामना ९ ऑगस्ट रोजी खेळण्यात येणार होता, तर या मालिकेतील शेवटचा सामना १५ ऑगस्टला खेळण्यात येणार होता. या मालिकेतील साामन्यांचे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार याचा निर्णय अद्याप झाला नव्हता. परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले, की या मालिकेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे आणि काही काळानंतर याचे आयोजन केले जाईल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे निक हॉकले (Nick Hockley) यांनी म्हटले, “आम्हाला मालिका पुढे ढकलण्याचे खूप दु:ख होत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वे क्रिकेटमध्ये खेळाडू, सामना अधिकारी आणि चाहत्यांची सुरक्षा पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी हाच सर्वात योग्य निर्णय आहे.”
२००४ नंतर झिंबाब्वे संघाचा हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा
२००४ नंतर झिंबाब्वे संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार होता. २००४मध्ये त्यांनी तिरंगी मालिका खेळली होती. यापूर्वी झिंबाब्वे संघाची आयर्लंड, अफगाणिस्तान आणि भारताविरुद्धची मालिकाही कोरोना व्हायरसमुळे रद्द झाली आहे.
झिंबाब्वे क्रिकेटचे कार्यवाहक व्यवस्थापकीय संचालक गिव्हमोर मकोनी यांनी म्हटले, “आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळण्यास खूप उत्सुक होतो. परंतु सध्याची परिस्थिती पाहता हा दौरा पुढे ढकलणे हाच एकमेव पर्याय होता. तरीही आम्ही ही मालिका पुन्हा आयोजित करण्याचा प्रयत्न करू.”
कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) मार्चपासून कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका झालेली नाही आणि अनेक मोठ्या मालिका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड, भारत- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका- भारत, इंग्लंड- श्रीलंका यांसारख्या मालिकांचा समावेश आहे. त्यामध्ये आता ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वे मालिकेचाही समावेश झाला आहे. याव्यतिरिक्त मार्चमध्ये होणारी आयपीएल स्पर्धाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
तरीही ८ जुलैपासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मालिकेची सुरुवात होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघांत ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसनंतर ही होणारी पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असेल.
याव्यतिरिक्त याच वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. परंतु तेदेखील स्थगित केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही आतापर्यंत आयसीसीने त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-अखेर न्यूझीलंडमध्ये जन्मलेला बेन स्टोक्स करणार इंग्लंडचे नेतृत्त्व
-…आणि त्या शतकानंतर सचिनसह असंख्य क्रिकेटप्रेमींचे डोळे पाणावले
-…आणि पाकिस्तानच्या संसदेत दिली गेली सचिन बाद झाल्याची बातमी