पुणे । पुण्याच्या अरत्रिका बिस्वासने महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित ज्युनियर आणि सब-ज्युनियर गटाच्या राज्यस्तरीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलींच्या गटात तिहेरी यश मिळवले. पुण्याच्या शाल्मली वाळुंजकरने १७ वर्षांखालील मुलींच्या गटात दोन सुवर्णपदके पटकावली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील जलतरण तलावावर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या ११ वर्षांखालील मुलींच्या १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये अरत्रिकाने अव्वल क्रमांक पटकावला. तिने १ मिनिटे २७.२१ सेकंद वेळ नोंदवली. नाशिकची ऋजला कुलकर्णी (१ मि. २८.७३ से.) दुसऱ्या, तर मुंबईची सानिका नवरे (१ मि. ३०.५७ से.) तिसऱ्या स्थानावर राहिली.
यानंतर अरत्रिकाने ११ वर्षांखालील मुलींच्या ५० मीटर फ्रीस्टाइलमध्येही सुवर्णपदक पटकावले. तिने ३१.१३ सेकंद वेळ नोंदवली. तिने मुंबईच्या आरुषी शर्मा (३२.३२ से.) आणि ठाण्याच्या रसिका नादरला (३२.७३ से.) मागे टाकले. पहिल्या दिवशी अरत्रिकाने १०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर १७ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या ८०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये पुण्याच्या शाल्मली वाळुंजकरने १० मिनिटे ३०.२१ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक ठरले. हे तिचे या स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक ठरले. पहिल्या दिवशी शाल्मलीने १५०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलींच्या ५० मीटर बॅक स्ट्रोकमध्ये पुण्याच्या तन्मय डोळसने ३८.६० सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. १७ वर्षांखालील मुलांच्या २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात पुण्याच्या साहील गणगोटेला (२ मि. २०.१० से.) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. १४ वर्षांखालील मुलांच्या २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात पुण्याच्या तनिष कुडलेने (२ मि. २९.८३ से.) रौप्यपदक, तर आरुष बधेने (२ मि. ३१.२४ से.) ब्राँझपदक जिंकले. मुंबईच्या आदित्य शहाने (२ मि. २९.६२ से.) सुवर्णयश मिळवले.यानंतर तनिषने २०० मीटर बटरफ्लायमध्ये २ मिनिटे २३.७७ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याच्या वरुण चव्हाणने (३४.९८ से.) सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या १०० मीटर बटरफ्लायमध्ये पुण्याच्या नंदिनी पेठकरने (१ मि. ०७.९८ से.) रौप्यपदक मिळवले.
निकाल : १७ वर्षांखालील मुले – ४०० मीटर फ्रीस्टाइल – यश पत्की (४ मि. २३.३३ से., मुंबई), शुभम धायगुडे (४ मि. २३.८६ से., पुणे), देव अंबोकर (४ मि. २९.४२ से., मुंबई). मुली – हिमानी फडके (५ मि. ४.५० से., नागपूर), शाल्मली वाळुंजकर (५ मि. ११.१० से., पुणे), अनन्या पांडे (५ मि. १८.१३ से., मुंबई).
१७ वर्षांखालील मुली – ५० मीटर फ्रीस्टाइल – केनिशा गुप्ता (२७.०६ से., मुंबई), नंदिनी पेठकर (२८.०७ से., पुणे), अवनी हयतनगरकर (२९.७६ से., पुणे).
१७ वर्षांखालील मुली – ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक – करीना शांक्ता (३५.३२ से., मुंबई), वैष्णवी मोरे (३७.४९ से., पुणे), सीया बिजलानी (३७.६२ से., मुंबई).
१७ वर्षांखालील मुली – २०० मीटर बटरफ्लाय – मैत्रायनी भोसले (२ मि. ४२.७२ से., मुंबई), स्नेह गोयल (२ मि. ४७.२१ से., पुणे), रिया टाओरी (२ मि. ४९.३८ से., पुणे).
१४ वर्षांखालील मुली – १०० मीटर बॅक स्ट्रोक – पलक धामी (१ मि. ०९.९५ से., मुंबई), ऋतजा नाडगौडा (१ मि. १६.१५ से., पुणे), अभा मिराशी (१ मि. १६.६२ से., ठाणे).
११ वर्षांखालील मुले -५० मीटर फ्रीस्टाइल – पार्थ जैन (३१.१३ से., मुंबई), शाश्वत भोमे (३१.४१ से., पुणे), क्रिश शहा (३३.१४ से., मुंबई).
९ व १० वर्षांखालील मुले – २०० मीटर वैयक्तिक मिडले – सम्यंक रामचंद्रे (३ मि. ००.७३ से., पुणे, तिसरा क्रमांक).