कधी ऐकलंय का हे ? ४ चेंडूत ९२ धावा आणि मॅच संपली. क्रिकेटला सभ्य माणसांचा खेळ असे म्हटले जाते. पूर्वापार ही म्हण रूढ झालेली आहे. परंतु, अनेकदा काही दिग्गज खेळाडूंकडूनही असभ्य वर्तन म्हणा किंवा नाराजी म्हणा ही उघडपणे दर्शवली गेलेली आहे. सुनील गावसकर यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पंचांच्या निर्णयावर नाराज होऊन डाव सोडण्याचा निर्णय असो नाहीतर रिकी पॉंटिंगचा खिलाडूवृत्ती सोडून सौरव गांगुलीच्या न घेतलेल्या झेलाचे प्रकरण असो. या कृतींनी खेळाला नक्कीच गालबोट लागले होते.
याच सारखा एक प्रकार बांगलादेशमधील घरगुती स्पर्धेत झाला होता. ज्यात अशाच नाराजीमुळे एका गोलंदाजाने चार चेंडूत ९२ धावा विरोधी संघाला बहाल केल्या होत्या.
११ एप्रिल २०१७ रोजी बांगलादेशमधील ढाका येथे ” ढाका सेकंड डिव्हिजन क्रिकेट लीग ” या स्पर्धेचा सामना लालमाटीया क्लब विरुद्ध अक्सीओम क्लब यांच्या दरम्यान खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना लालमाटीया क्लब १४ षटकात ८८ धावात सर्वबाद झाला.
अक्सीओम क्लब ८९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. लालमाटीया क्लबचा युवा गोलंदाज सुजोन मेहमूद पहिले षटक टाकण्यासाठी आला. लालमाटीया क्लब त्यांच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. सर्वांना रंगतदार सामन्याचे अपेक्षा केली होती.पण..
सुजोन मेहमूदने सर्वांच्या अपेक्षित विपरीत गोलंदाजी करायला सुरुवात केली. एक-दोन नव्हे तर तब्बल १३ वाईड आणि १५ नो बॉल त्याने टाकले. सर्वच्या सर्व १३ वाईड हे सीमारेषेपार पोचले. ज्यामुळे प्रत्येक वाईडच्या १३ अतिरिक्त धावा व चौकारांच्या ५२ अशा एकूण ६५ धावा आणि १५ नोबॉलच्या १५ अतिरिक्त अशा मिळून ८० अवांतर धावा दिल्या गेल्या. अक्सीओमच्या फलंदाजांनी १२ धावा केल्या. अशाप्रकारे अक्सीओमने चार चेंडूत सामना जिंकला.
त्याचे झाले असे की, ज्यावेळी दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात आले त्यावेळी, लालमाटीया संघाच्या कर्णधाराला नाणेफेकीसाठीचे नाणे दाखवण्यात आले नव्हते. अक्सीओम संघाने टॉस जिंकला असे जाहीर करून लालमाटीया क्लबला फलंदाजी करण्यास सांगितले. फलंदाजी करत असताना पंचांचे अनेक निर्णय लालमाटीया क्लबच्या विरोधात गेले.
लालमाटीया क्लबचे सचिव अदनान दीपोन यांनी सांगितले की,
” संपूर्ण सामन्यात आमच्या संघावर अनेक चुकीचे निर्णय लादले गेले. आमचे सर्व खेळाडू १८-१९ वर्षीय असल्याने ते हा अन्याय सहन करू शकले नाहीत. सुजोन मेहमूदने या सर्व निर्णयांचा निषेध म्हणून ही गोलंदाजी केली आहे. यामध्ये काही चुकीचे झाले नाही. एक क्लब म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी आहोत.”
वाचा- हेन्री ओलोंगा: थेट आपल्याच देशाच्या राष्ट्रपतीला भिडलेला क्रिकेटर