क्रिकेटमध्ये ते तुम्ही ऐकले असेल बघा “Catches Win Matches.” म्हणजेच काय तर झेल घेतले तर सामने जिंकाल. आपणा सर्वांनाच माहित आहे, क्रिकेट म्हटलं की त्यातील कोणत्याही सामन्यात सर्वात महत्त्वाचे असतं ते म्हणजे क्षेत्ररक्षण. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू स्टीव्ह वॉ यांचे वाक्य तर तुम्ही ऐकलेच असेल, “तुम्ही झेल नाही तर विश्वचषक हातातून गमावला आहे.” हे वाक्य त्यांनी हर्षल गिब्जने मिड- विकेटवर एक सोपा झेल सोडल्यानंतर म्हटले होते. नंतर त्यांनी हे वाक्य म्हटलंच नसल्याचंही सांगितलं.
तो १९९९ सालच्या विश्वचषकातील सुपर सिक्समधील शेवटचा सामना होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. त्यावेळी वॉ ५६ धावांवर खेळत होते, तेव्हाच गिब्ज यांनी त्यांचा झेल सोडत, त्यांना जीवदान दिले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने केवळ तो सामनाच जिंकला नाही, तर विश्वचषक आपल्या नावावर केली. त्यामुळे खराब क्षेत्ररक्षण किती महागात पडू शकते, हे यावरून समजते.
परंतु याबाबतीत भारतीय संघ मागे नसल्याचे दिसते. कारण सुरेश रैना, रविंद्र जडेजा, मनीष पांडे, विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांसारखे खेळाडू सध्याच्या काळातील भारतीय संघाचे सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानले जातात.
या लेखात आपण भारतीय क्षेत्ररक्षकांनी घेतलेल्या अप्रतिम झेलांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.
चला तर मग जाणून घेऊया…
३. श्रीसंत विरुद्ध पाकिस्तान (२००७)
२००७ साली जोहान्सबर्ग येथे टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना त्या दोन संघांमध्ये पार पडला होता, ज्यांचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरलेले असतात. ते दोन संघ म्हणजेच भारत आणि पाकिस्तान. त्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने गौतम गंभीरच्या ५४ चेंडूतील ७५ धावांच्या मदतीने ५ बाद १५७ धावांची दीडशतकी धावसंख्या उभी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने मोहम्मद हाफिज आणि कामरान अकमलच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. परंतु त्यानंतर पाकिस्तान संघाने आपला डाव सांभाळला आणि आव्हानाच्या दिशेने वाटचाल केली. एक वेळ तर असे वाटत होते, की मधल्या फळीतील फलंदाज मिस्बाह उल हक (Misbah Ul Haq) पाकिस्तानला हा अंतिम सामना जिंकून देतो की काय.
सामना अटीतटीचा होत चालला होता. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती आणि हातात केवळ १ विकेट होती. शेवटचे षटक टाकत होता भारताचा जोगिंदर शर्मा. पहिला चेंडू गेला वाईड. पुढील चेंडू मिस्बाहने बीट केला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूत त्याने लाँग ऑफवरून थेट षटकार ठोकला. आता पुढील ४ चेंडूत ६ चेंडूंची आवश्यकता होती. तिसऱ्या चेंडूवर मिस्बाहने स्कूप शॉट खेळला आणि डीप फाइन लेगवर उभा असलेल्या एस. श्रीसंतने (S Sreesanth) चेंडू झेलला. त्याच्या त्या झेलमुळे भारतीय संघाने २००७ सालचा पहिला वहिला टी२० विश्वचषक आपल्या नावावर केला.
२. युवराज सिंग विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२००२)
२००२ च्या चँपियन्स ट्रॉफीचा उपांत्य सामना कोलंबो येथे भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका संघात झाला होता. भारताचा तत्कालीन कर्णदार सौरव गांगुलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारताने विरेंद्र सेहवागच्या ५९ आणि युवराज सिंगच्या ६२ धावांच्या मदतीने ९ बाद २६१ धावसंख्या उभी केली होती.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाचा डाव १ बाद १९२ इतका होता. त्यांना विजयासाठी ७१ चेंडूत ६८ धावांची आवश्यकता होती. तसेच त्यांच्या हातात अजूनही ९ विकेट्स बाकी होत्या. तरीही नशीब मात्र त्यावेळी भारताच्या बाजून होते. पुढे हर्षल गिब्ज रिटायर्ड हर्ट झाला. सामना तेव्हा पलटला, जेव्हा हरभजनच्या गोलंदाजीवर जॉन्टी ऱ्होड्सने (Jonty Rhodes) चेंडू स्वीप केला खरा परंतु तो योग्य वेळेवर खेळू शकला नाही. त्याचवेळी युवराज सिंगने (Yuvraj Singh) डाईव्ह मारत उत्कृष्ट झेल घेतला आणि भारताची अपेक्षा सामन्यात कायम ठेवली.
त्यानंतर सामन्यात एक ट्विस्ट आला तो असा, की दक्षिण आफ्रिका संघाने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या आणि शेवटी ते केवळ ६ बाद २५१ धावाच करू शकले. अशाप्रकारे भारताने तो सामना १० धावांनी जिंकला होता.
१. कपिल देव विरुद्ध वेस्ट इंडिज (१९८३)
तो विश्वचषक तर सर्वांनाच आठवत असेल नाही का. आता तुम्ही म्हणाल तो म्हणजे कोणता, तर तो म्हणजेच १९८३ चा विश्वचषक. १९८३ च्या विश्वचषकाने भारतीय क्रिकेटची दिशा आणि दशा दोन्हीही बदलून टाकली होती. कपिल देव यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या नेतृत्वातील भारतीय संघ त्या विश्वचषकात सर्वच संघांना तोडीस तोड प्रत्युत्तर देत अंतिम सामन्यात पोहोचला होता. भारताने त्या विश्वचषकात वेस्ट इंडिज संघासमोर १८४ धावांचे आव्हान दिले होते. भारताला बलविंदर संधू आणि मदन लाल यांनी गोलंदाजी करत उत्कृष्ट सुरुवात करून दिली. त्यांनी अनुक्रमे गार्डन ग्रेनेजला १ आणि डेस्मंड हेन्सला १३ धावांवर बाद केले होते.
तरीही विंडीज संघाची तोफ सर विवियन रिचर्ड्स (Sir Vivian Richards) त्यावेळी ७ चौकारांच्या मदतीने ३३ धावांवर खेळत होते. ते कधीही सामना पलटू शकत होते. भारताला तो सामना जिंकण्यासाठी काहीतरी युक्ती लढवावी लागणार होती. तत्कालीन कर्णधार कपिल देव यांनी ती जबाबदारी घेतली आणि रिचर्ड्स यांना झेलबाद करत पव्हेलियनच्या दिशेने मार्गस्थ होण्यास भाग पाडले. त्यावेळी कपिल देव मिड- विकेटवर उभे होते आणि त्यांनी मागे जात एक कठीण झेल सहजरित्या झेलला. त्यानंतर भारतीय क्रिकेटचा चेहराच बदलला. तो सामना भारतीय संघाने पूर्ण ४३ धावांनी जिंकला होता.