इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा चौदावा हंगाम आता दुसर्या टप्प्याकडे वळतो आहे. जवळपास सगळ्याच संघांचे ७ सामने झाले असून आता परतीच्या मुकाबल्यांना सुरुवात झाली आहे. एकूण २९ सामने पार पडले असून ३१ सामने बाकी आहेत.
सध्या गुणतालिका पाहिली, तर संघांमध्ये काट्याची टक्कर दिसून येते आहे. बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची शर्यत आता चांगलीच चुरशीची झाली आहे. याच पार्श्वभूमीवर या लेखात आपण बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता असलेल्या संघांची नावे पाहूया.
बाद फेरीसाठी आहे कडवी लढत
यंदाच्या आयपीएलच्या हंगामात बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी चांगलीच चुरस रंगण्याची चिन्हे आहेत. आत्ता केवळ अर्धा टप्पा पार झाला असला तरी बाद फेरीच्या संघाचा अंदाज बांधणे, काहीसे सोपे आहे. सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेले दिल्ली कॅपिटल्स आणि दुसर्या स्थानी असलेले चेन्नई सुपर किंग्ज हे संघ बाद फेरीसाठी निश्चित पात्र ठरतील, असे चित्र आहे. दिल्लीचे आत्ताच १२ गुण झाले असून चेन्नईचे देखील १० गुण झाले आहेत. तसेच त्यांचा फॉर्म बघता त्यांना उर्वरित सामन्यांपैकी किमान दोन अथवा तीन सामने जिंकणे, फारसे कठीण जाणार नाही.
याव्यतिरिक्त तिसर्या स्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची देखील बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता अधिक आहे. त्यांचे देखील १० गुण झाले असून यंदाच्या हंगामात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. संघात समतोल चांगला राखला गेल्याने त्यांना उर्वरित सामन्यांपैकी तीन सामने जिंकून बाद फेरीसाठी पात्र ठरणे, अवघड जाणार नाही. मात्र आता खरी चुरस चौथ्या स्थानासाठी रंगणार आहे.
सद्यस्थितीत चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ ८ गुणांसह विराजमान आहे. पहिल्या काही सामन्यात संघर्ष करत असलेल्या मुंबईने नंतर मात्र आपला फॉर्म परत मिळवत मागील दोन सामन्यात विजय मिळवला आहे. हाच फॉर्म त्यांनी कायम राखल्यास त्यांना बाद फेरीसाठी पात्र ठरता येईल. मात्र त्यांना आव्हान देण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे संघ उत्सुक असतील. या दोन्ही संघांचे प्रत्येकी ६ गुण झाले आहेत. हे गुण कमी असले तरी उर्वरित सामन्यांपैकी त्यांनी ५ सामने जिंकले, तर त्यांना बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची संधी असेल. अन्यथा सध्या अव्वल चार स्थानी असलेले संघच बाद फेरीसाठी आपली जागा पक्की करतील.
महत्वाच्या बातम्या: