भारतीय क्रिकेटचा प्रवास आत्तापर्यंत खूप दैदिप्यमान राहिला आहे. १९३२ मध्ये इंग्लंड विरुद्ध पहिली कसोटी खेळून या प्रवासाला सुरुवात झाली. आज २०२० मध्ये भारत क्रिकेटची एक महासत्ता आहे. यादरम्यान भारताला अनेक दिग्गज कर्णधार लाभले ज्यांच्या नेतृत्वात संघाने नेटाने वाटचाल केली.
कसोटी क्रिकेटमध्ये असे काही कर्णधार राहिले ज्यांनी आपल्या नेतृत्वाने भारताला अनेक विजय मिळवून दिले. काही सामान्य खेळाडूंनी नेतृत्वा करताना यशाचे झेंडे रोवले तर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड या दिग्गज खेळाडूंना कर्णधारपद तितकेसे मानवले नाही.
आज आपण, भारताच्या ८८ वर्षाच्या कसोटी क्रिकेट इतिहासामध्ये सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या पाच भारतीय कर्णधारांविषयी जाणून घेऊया.
१) विराट कोहली
भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली. विराटच्या हाती नेतृत्व आल्यानंतर भारत तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवताना दिसून येत आहे.
विराटच्या नेतृत्वात भारत वनडे व टी२० प्रकारात यशस्वी ठरला आहे. मात्र, कसोटी क्रिकेटवर त्याच्या नेतृत्वात भारताने अधिराज्य गाजवलेले दिसून येते. विराटने जानेवारी २०१५ पासून पूर्णवेळ कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी निभावताना ५५ सामन्यांपैकी ३३ सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे. भारताला फक्त १२ सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका विजयाचा पराक्रम देखील भारताने विराटच्या नेतृत्वात केला आहे.
२) एमएस धोनी
भारताच्या सर्वकालीन महान कर्णधारांमध्ये धोनीचे नाव अग्रभागी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीने आपल्या नेतृत्वात भारताला सर्वाधिक विजय मिळवून दिलेले आहेत. २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताने २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकला होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांमध्ये धोनीचा क्रमांक दुसरा लागतो. ७ वर्षे त्याने भारतीय कसोटी संघाची धुरा वाहिली.
भारताने धोनीच्या नेतृत्वात ६० कसोटी सामने खेळले. ज्यात भारताला २७ सामन्यात विजय मिळवता आले तर १८ पराभवही वाट्याला आले. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पहिल्यांदा अव्वल क्रमांकावरही धोनीच्या नेतृत्वात आला होता.
३) सौरव गांगुली
भारतीय क्रिकेटचे रूप बदलण्याचे श्रेय सौरव गांगुलीकडे जाते. फलंदाज म्हणून अप्रतिम कामगिरी केल्यानंतर गांगुलीकडे भारतीय संघाचे कर्णधारपद दिले गेले. पाच वर्ष भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवताना, गांगुलीने आपल्या आक्रमक नेतृत्वाच्या जोरावर भारताला अनेक महत्वाचे विजय मिळवून दिले.
परदेशात विजय मिळवण्याची सवय भारतीय संघाला गांगुलीच्या नेतृत्वात लागली. गांगुलीने ४९ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात भारताने २१ सामने जिंकले व १५ सामने अनिर्णित राखले. तसेच, ११ सामन्यात भारताचा पराभव देखील झाला.
४) मोहम्मद अजहरुद्दिन
भारतीय क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांमध्ये माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिन याचा समावेश देखील होतो. आपल्या काळातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या अजहरुद्दिनने नेतृत्वामध्ये सुद्धा आपली वेगळी ओळख तयार केली. अजहरुद्दिनने सलग तीन विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले होते.
वनडेसोबतच, कसोटीमध्ये देखील त्याने कर्णधारपदाची जबाबदारी अनेक वर्ष सांभाळली. ४७ कसोटी सामन्यात नेतृत्व करताना अजहरुद्दिनने भारताला १४ विजय मिळवून दिले. १४ सामन्यात पराभव व १९ सामने अनिर्णीत राखत त्याने कर्णधार म्हणून संमिश्र यश मिळवले.
५) सुनील गावसकर
भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांचादेखील या यादीत समावेश होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १०,००० धावा बनवणारे फलंदाज म्हणून त्यांची नोंद आहे. गावसकर यांच्या नावे ३४ कसोटी शतके सुद्धा आहेत.
गावसकर यांनी ४७ सामन्यात भारताचे नेतृत्व केले. त्यात भारताला ९ कसोटीत विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले. तर, ८ कसोटीत भारताला पराभव पत्करावा लागला. गावसकर यांच्याच नेतृत्वात भारताने सर्वाधिक ३० कसोटी सामने अनिर्णीत राखले.
ट्रेंडिंग लेख –
कसोटीत खेळताना जगभर धुमाकूळ घालणारे भारताचे सर्वात यशस्वी ५ गोलंदाज
चाहत्यांना नेहमीच क्रिकेटच्या ड्रेसिंग रुमचे कुतूहल असते, मग ती ड्रेसिंग रुम नक्की असते तरी कशी?
४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटर सापडली नाडाच्या जाळ्यात, होऊ शकते ४ वर्षांसाठी बंदी
कुटुंबातील सदस्याच्या निधनामुळे हुकले इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूचे कसोटी पदार्पण