fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कोरोनामुळे घरात बसलाय, हे स्पोर्ट्सवरील ५ सिनेमे नक्की पहा

कोराना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे जगातील अन्य देशांप्रमाणेच भारतातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा कर्मचारी वगळता सर्वच जण घरात आहेत. क्रीडाजगत एकप्रकारे ठप्प झाले आहे.

त्यामुळे क्रीडाप्रेमींसमोर या काळात कोणत्याही स्पर्धा सुरु नसल्याने वेळ घालवण्याचा प्रश्न पडला असेल. पण अशा क्रीडाप्रेमींबरोबरच घरातील सर्वांनाच क्रीडाक्षेत्रावर आत्तापर्यंत बनलेले चित्रपट या काळात पहाता येऊ शकतात.

क्रीडाविश्वावर बनलेले हे चित्रपट आपण पाहू शकतो – 

१. एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी – 

भारताचा ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात सुशांतसिंग राजपूतने धोनीची भूमिका हुबेहुब निभावली आहे. या चित्रपटात धोनीच्या वैयक्तीक आयुष्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच त्याच्या जन्मापासून ते भारतीय संघाचा कर्णधार म्हणून २०११ विश्वचषक जिंकण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निरज पांडेने केले आहे.

२. भाग मिल्खा भाग – 

भारताचे धावपटू मिल्खासिंग यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात मिल्खासिंग यांच्या लहानपणापासूनची प्रवास दाखवण्यात आला आहे. तसेच भारत-पाकिस्तान फाळणीमुळे आलेले संकट, त्यांचे वैयक्तिक आयुष्य ते एक यशस्वी धावपटू होण्यासाठी त्यांनी घेतलेली कठोर मेहनत अशा सर्व गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात मिल्खासिंग यांची भूमिका अभिनेता फरहान अख्तरने केली आहे.

३. दंगल –

दंगल हा चित्रपट भारताच्या कुस्तीपटू गीता आणि बबीता फोगट आणि त्यांचे वडील आणि प्रशिक्षक महावीर सिंग फोगट यांच्या प्रवासावर अधारित आहे. हरियाणातील एका लहान गावातून महावीर यांनी गीता आणि बबीता यांना कुस्तीपटू बनवण्यासाठी समाजाच्या विरोधात जाऊनही घेतलेली मेहनत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

तसेच गीता फोगटचा राष्ट्रीय चॅम्पियन ते राष्ट्रकूल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू हा प्रवासाही या चित्रपटात दाखवला आहे. बॉलिवूड अभिनेता अमिर खानने महावीर सिंग फोगट यांची भूमीका निभावली आहे तर गीता फोगटची लहानपणीची भूमीका झायरा वासिमने तर युवा गीता फोगटची भूमिका फातिमा सना शेख यांनी निभावली आहे. लहान बबीताची भूमिका सुहानी भटनागरने तर मोठ्या झालेल्या बबीताची भूमिका सान्या मल्होत्राने केली आहे.

४. पान सिंग तोमर – 

भारतीय आर्मीतील जवान पान सिंग तोमर ज्यांनी नॅशनल गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवले त्यांच्या जीवनावरील हा चित्रपट आहे. पण काही परिस्थितीनुसार त्यांना डाकू बनण्यास भाग पाडले, यावरही या चित्रपटात प्रकाश टाकला आहे. या चित्रपटात इरफान खानने पान सिंग तोमर यांची भूमिका निभावली आहे. या चित्रपटाला उत्कृष्ट फीचर फिल्मचा तर इरफान खानला उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

५. इक्बाल – 

भारतातील जवळजवळ प्रत्येक लहान मुलाला क्रिकेटपटू बनावे असे एकदातरी वाटते. असेच क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पहाणाऱ्या एका मुकबधीर मुलावर हा चित्रपट अधारित आहे. या चित्रपटात या मुलाची भूमिका श्रेयस तळपदेने निभावली आहे. या चित्रपटात तो एका व्यसनाधीन माजी क्रिकेटपटूकडून प्रशिक्षण घेतानाही दाखवला आहे. या व्यसनाधीन माजी खेळाडूची भूमिका नसरुद्दीन शहा यांनी निभावली आहे.

६. मेरी कोम –

६ वेळा वर्ल्डचॅम्पियनशीप विजेती आणि ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. मेरी कोमची भूमीका प्रियंका चोप्राने केली आहे. भारताच्या ईशान्य भागातून बॉक्सर बनण्याचा सुरु झालेला मेरी कोमचा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. तसेच तिने मुलांना जन्म दिल्यानंतरही बॉक्सर म्हणून कारकिर्द घडवण्यासाठी केलेली मेहनतही या चित्रपटात दाखवली आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

व्हिडीओ: आता केदार जाधवही म्हणतोय, गो कोरोना

भारताचे सर्वात यशस्वी ५ विकेटकिपर, ज्यांनी वनडेमध्ये घडवला आहे इतिहास

कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी महान क्रिकेटर दान करणार आपल्या मौल्यवान वस्तु

You might also like