पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी चॅलेंजर करंडक 3दिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत ८ संघांना आमंत्रित करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सामने पीवायसी हिंदू जिमखाना,डेक्कन जिमखाना, नेहरू स्टेडियम, डीव्हीसीए व पुना क्लब मैदानावर होणार आहेत.
अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखान्याचे सचिव श्री आनंद परांजपे व क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांनी सांगितले की या स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, केडन्स, क्लब ऑफ महाराष्ट्र, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी, पुना क्लब, एमसीए कंबाईंड क्लब व एमसीए कंबाईंन डिस्ट्रिक्टस हे ८ संघ झुंजणार आहेत. ही स्पर्धा बाद पध्दतीने होणार असून पहिल्या फेरीतील विजेता संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे.
ते पुढे म्हणाले की, पीवायसी हिंदू जिमखानाच्या वतीने पहिल्यांदाच अशा प्रकारचे तीन दिवसांचे सामने असलेली स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक देण्यात येणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा,उपांत्य फेरीचा व अंतिम सामना पीवायसीच्या मैदानावर होणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्ठीरक्षक आणि मालिकावीर यांनादेखील आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.