आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रमवारीला नजीकच्या काळात खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वोत्कृष्ट संघाची क्रमवारी, सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजांची क्रमवारी, अष्टपैलूंची क्रमवारी अशा अनेक क्रमवार्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी जाहीर करत असते. काही माजी खेळाडू व क्रिकेट समीक्षक या क्रमवारीला तितकेसे महत्त्व देत नाहीत. पण, आयसीसीकडून दरवर्षी मिळणाऱ्या बोनससाठी मात्र ही क्रमवारी उपयोगी येते. खेळाडूंची वैयक्तिक क्रमवारी त्या खेळाडूचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सद्यस्थितीतील स्थान दर्शवत असते.
अनेक खेळाडूंनी या क्रमवारीवर खूप वर्ष राज्य केले आहे. कोणी निरंतर काळासाठी फलंदाजांच्या तर कोणी गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत बराच काळ शीर्षस्थानी राहिले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका माजी भारतीय कर्णधाराविषयी सांगणार आहोत ज्याने अवघ्या ४२ एकदिवसीय डावात एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. तर , हा भारतीय खेळाडू आहे भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी.
२३ डिसेंबर २००४ रोजी बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय पदार्पण करताना दोन्ही पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला होता. त्यानंतरही चार सामन्यात तो कमाल करू शकला नाही. २००५ मध्ये पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला असता, विशाखापट्टणम वनडेमध्ये १४८ धावांची तुफानी खेळी करत धोनीने लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने संघाला अनेक एकहाती विजय मिळवून दिले. यादरम्यान, श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ तसेच इतर अनेक संघांविरुद्ध मॅचविनिंग खेळ्या करत तो भारताचा तसेच जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज बनला होता.
आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर, २० एप्रिल २००६ रोजी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग याला हटवून, धोनी आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी आला. हा टप्पा पार करण्यासाठी धोनीने अवघे ४२ एकदिवसीय डाव घेतले होते. त्यावेळी तो पदार्पणानंतर सर्वात जलद एकदिवसीय फलंदाजी क्रमवारी अव्वल क्रमांक मिळवणारा खेळाडू ठरला होता. आजही हा विक्रम त्याच्याच नावावर आहे. त्याने जेव्हा पहिल्यांदा अव्वल स्थान पटकावले त्यानंतर मात्र, दुसऱ्याच आठवड्यात ॲडम गिलख्रिस्टने धोनीची जागा पटकावली.
पण २००९ मध्ये धोनीने पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठले. त्याने केवळ २४ डावात ७०.४३ च्या जबरदस्त सरासरीने ११९८ धावा फटकावल्या. त्यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये रिकी पॉंटिंगसह तो संयुक्तरीत्या अव्वलस्थानी होता. यानंतर तो सलगपणे बरेच महिने अव्वलस्थानी राहिला. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाचा माईक हसी त्या जागी विराजमान झाला. २००६- २०१६ अशी सलग दहा वर्ष धोनी एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत अव्वल १० मध्ये होता.
धोनीने भारताचे ३५० वनडे सामन्यात प्रतिनिधित्व करताना ५०.५३ अशा विस्मयकारक सरासरीने १०,७७३ धावा फटकावल्या. भारताच्या टी२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा तो कर्णधार होता. काही दिवसांपूर्वीच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या तो आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी यूएईमध्ये दाखल झाला आहे. आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता
या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
आयपीएलमध्ये फलंदाजांना रडकुंडीला आणणारे ६ भारतीय गोलंदाज
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल ५ महिन्यांनतर मैदानात उतरल्याबद्दल कॅप्टन कोहली म्हणतो, असे वाटते की…
वेगवान गोलंदाज दीपक चहराला कोरोनाची लागण? बहिण मालतीने दिली अशी प्रतिक्रिया
राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकांनी केली कोरोनावर मात; दुबईमध्ये झाले दाखल