भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला पहाटे मोठा अपघात झालेला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला असून, सध्या मुंबई येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लिगामेंट तुटल्याने त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, आता त्याला मैदानावर येण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो अशी बातमी समोर येत आहे.
रिषभच्या अपघातानंतर त्याच्यावर सुरुवातीला डेहराडून येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील केली गेली. या शस्त्रक्रियेनंतर येत असलेल्या वृत्तानुसार, रिषभला पुन्हा एकदा आपल्या दोन्ही पायांवर उभे राहण्याकरता 7-8 आठवड्यांचा अवधी लागू शकतो. परंतु त्याचवेळी त्याला मैदानावर सामन्यासाठी तंदुरुस्त होऊन परतण्यासाठी जवळपास 8-9 महिने लागू शकतात. या वृत्तांमध्ये तथ्य असल्यास रिषभ मायदेशात होणाऱ्या वनडे विश्वचषकाला मुकेल.
सध्या भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत व्यस्त आहे. यानंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 3 वनडे आणि तितकेच टी20 सामने खेळेल. त्यानंतर भारतीय संघाला मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. जुलैमध्ये, भारत वेस्ट इंडिजविरुद्ध 2 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळेल.
सप्टेंबरमध्ये भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार असून, पंतचे या मालिकेतून मैदानात परतणे सध्या तरी कठीण वाटत आहे. वनडे विश्वचषक ऑक्टोबरमध्ये खेळला जाईल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 टी20 आणि वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेसोबत 2 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. त्यामुळे रिषभ जवळपास संपूर्ण वर्षभर मैदानापासून लांब राहण्याची शक्यता आहे.
(Rishabh Pant Might Miss ODI World Cup 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
40 वर्षापासून श्रीलंका भारतात फेल! सूर्य खेळीने विजय साकार, भारताच्या यशाचे काही बलाढ्य रेकॉर्ड्स
आयपीएल न खेळता पंत मालामाल! बीसीसीआय मोजणार 21 कोटींची रक्कम