गतविजेत्या इंग्लंड संघाला विश्वचषक 2023 स्पर्धेत अपयशाशिवाय दुसरं काहीही हाती लागताना दिसत नाहीये. स्पर्धेतील एक सामना सोडला, तर खेळलेल्या उर्वरित तिन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांनी आपला चौथा आणि स्पर्धेचा 20वा सामना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने त्यांचा तब्बल 229 धावांनी पराभव केला. हा त्यांचा तिसरा पराभव ठरला. या पराभवामुळे कर्णधार जोस बटलर खचून गेला. त्याने सामन्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
झाले असे की, या सामन्यात इंग्लंड (England) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 399 धावांचा पाऊस पाडला. अशात 400 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडचा डाव 22 षटकातच 170 धावांवर पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. त्यामुळे हा सामना दक्षिण आफ्रिकेने 229 धावांनी नावावर केला.
काय म्हणाला बटलर?
जोस बटलर (Jos Buttler) याच्या नेतृत्वात इंग्लंडचा आतापर्यंत विश्वचषकातील प्रवास निराशाजनक राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकतर्फी पराभवानंतर बटलर म्हणाला, “खूपच निराश झालो आहे. आम्हाला वाईटरीत्या हरवले आहे. आम्ही इथे चांगले क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत. पहिल्या डावात अनेक गोष्टी आमच्या बाजूने नव्हत्या. रीस टोप्लीला दुखापत झाली, पण आमच्या खेळाडूंनी चांगली झुंज दिली. आम्ही त्यांना 340-350 धावांपर्यंत रोखू शकत होतो आणि ते आव्हान चांगल्याप्रकारे पार झाले असते. कडक उन्हात खेळणे जरा कठीण राहिले. आम्हाला एक चांगली सुरुवात हवी होती, पण काही विकेट्स लवकर पडल्या. इथून आम्हाला प्रत्येक सामना जिंकावा लागेल.”
खरं तर, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी हेन्रीच क्लासेन आणि मार्को यान्सेन यांनी अखेरच्या षटकात तडाखेबंद फटकेबाजी केली. क्लासेनने 109 धावांची वादळी शतकी खेळी साकारली, तर यान्सेननही 75 धावांची नाबाद खेळी केली. त्यापूर्वी रीजा हेंड्रिक्स यानेही 85 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या शानदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडपुढे 400 धावांचे आव्हान ठेवले, पण इंग्लंडचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. अखेरीस मार्क वूड याने 43 धावांची धमाकेदार खेळी करत चाहत्यांचे मनोरंजन केले. (cwc 2023 england captain jos buttler after big loss against south africa says this read here)
हेही वाचा-
“मला नाही वाटत मी योग्य…” सामनावीर पुरस्कार मिळाल्यावर नाखुश दिसला क्लासेन
BREAKING: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का, हार्दिकनंतर ‘हा’ प्रमुख फलंदाजही दुखापतग्रस्त