वीजपुरवठा खंडीत होणे हे अनेक भारतीयांसाठी नवीन काही नाही. मात्र, जर असं सांगितले की लाईव्ह आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यादरम्यान वीजपुरवठा खंडीत झाला होता, तर मात्र ही आश्चर्याची आणि दुर्मिळ गोष्ट आहे. पण असं घडलं, तेही ऍशेस सारख्या कसोटी मालिकेत. ऍशेस २०२१-२२ मालिकेतील पहिल्या कसोटीदरम्यान द गॅबा स्टेडियमवरील वीजपुरवठा काही काळासाठी शनिवारी (११ डिसेंबर) खंडीत झाला होता.
द गॅबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात पहिला कसोटी सामना खेळला गेला. या सामन्याचा शनिवारी चौथा दिवस होता. या दिवसाच्या सुरुवातीला १०-१२ षटके झाल्यानंतर वीजपुरवठा खंडीत झाल्याचे लक्षात आले. यामुळे पहिल्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट देखील ठप्प झाले होते. साधारण अर्धा तासासाठी ही समस्या उद्भवली होती. या अर्धातासात सामन्यातील डीआरएस प्रणाली देखील बंद होती. याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच माहिती दिली होती.
ही समस्या उद्भवल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रवक्ताने सांगितले होते की ‘गॅबामध्ये वीजपुरवठ्यामध्ये समस्या निर्माण झाल्याने ब्रॉडकास्ट सेंटर देखील प्रभावित झाले आहे. यामुळे जगभरात या सामन्याचे लाईव्ह प्रसारण होऊ शकत नाहीये. सर्वकाही शक्य तितक्या लवकर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी काम सुरू आहे.’
तसेच प्रवक्त्याने हे देखील स्पष्ट केले की, या समस्येचे निराकरण होईपर्यंत डीआरएस प्रणालीही बंद होती. त्यामुळे त्या कालावधीदरम्यान सामन्यातील निर्णय केवळ मैदानावरील पंचांवरच अवलंबून होते. तसेच वीजपुरवठा खंडीत झाल्याने स्टेडियमवरील बिग स्क्रीनदेखील बंद झाल्या होत्या. तरी, साधारण अर्धातासानंतर पुन्हा लाईव्ह प्रसारण सुरू झाले.
.@CricketAus confirms there's a power issue at the Gabba affecting the broadcast around the world. Hopefully back ASAP! Tune in to the ABC radio feed in our match centre for commentary from the ground #Ashes
— cricket.com.au (@cricketcomau) December 11, 2021
पहिल्या ऍशेस सामन्यात यापूर्वीही काही तांत्रिक समस्या समोर आल्या होत्या. गुरुवारी (९ डिसेंबर) ब्रॉडकास्टरने सांगितले होते की, ज्या उपकरणाने पंच फ्रंटफुट नो बॉल तपासतात, ते तुटले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातील सीमाबंदींमुळे स्निको टेक्नॉलॉजी देखील या सामन्यासाठी उपलब्ध नाही.
ऑस्ट्रेलियाने जिंकला पहिला सामना
द गॅबा येथे झालेला पहिला ऍशेस सामना ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सने जिंकून ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता पुढील सामना ऍडलेड ओव्हलला १६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हा सामना दिवस-रात्र स्वरुपातील असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच होणार असं, ऍशेस मालिकेतील २ सामने खेळवले जाणार दिवस-रात्र स्वरुपात
तब्बल ३३ वर्षांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणालाच जमला नाही, तो पराक्रम केवळ टीम इंडियाने करुन दाखवलाय
मलानची विकेट घेताच लायनची ३ मोठ्या विक्रमांना गवसणी; अश्विन, मुरलीधरनच्या पंक्तीत स्थान