---Advertisement---

जे कर्णधार विराटलाही नाही जमलं, ते रहाणेने फक्त ६ कसोटीत करून दाखवलं; धोनीची केलीय बरोबरी

On: सोमवार, नोव्हेंबर 29, 2021 10:00 PM
---Advertisement---

कानपूर| भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ग्रीन पार्कमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात उभय संघांनी शानदार खेळ दाखवला. दोन्ही संघांनी हा सामना जिंकण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट दिले. धाकधूक वाढवलेला हा सामना पाच दिवस चालला आणि अखेर न्यूझीलंड संघाला हा सामना अनिर्णीत राखण्यात यश आले. केवळ एका विकेटमुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाची विजयाची संधी हुकली. परंतु हा सामना अनिर्णीत राहिल्याने यजमान संघाचा कर्णधार रहाणेच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली आहे.

रहाणेचा हा संघनायक म्हणून सहावा कसोटी सामना होता. या सामन्याचा निकाल अनिर्णीत असा लागल्याने रहाणे ६ कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहणारा केवळ दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने आतापर्यंत भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व केलेल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. तर त्याच्या नेतृत्त्वाखालील २ कसोटी सामने अनिर्णीत राहिले आहेत.

रहाणेपूर्वी भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टनकूल एमएस धोनी याने हा पराक्रम केला होता. धोनीच्या नेतृत्त्वाखालील पहिल्या ६ कसोटी सामन्यांत भारतीय संघ अपराजित राहिला होता. 

दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३४५ धावांचा डोंगर उभारला होता. भारताकडून या डावात पदार्पणवीर श्रेयस अय्यरने १०५ धावांची मोठी खेळी केली होती. तसेच सलामीवीर शुबमन गिल आणि रविंद्र जडेजा यांनी अर्धशतक झळकावली होती. या डावाता न्यूझीलंडकडून टीम साउदीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या.

भारताच्या या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २९६ धावांवरच गारद होता. न्यूझीलंडकडून केवळ त्यांचे सलामीवीर टॉम लॅथम (९५ धावा) आणि विल यंग (८९ धावा) अर्धशतके करू शकले होते. भारताकडून या डावात अक्षर पटेलने विकेट्सचा पंचक घेतला होता. अशाप्रकारे भारताने पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतली होती.

या ४९ धावांच्या आघाडीमध्ये २३४ धावांची भर घालत भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २८५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ पाचव्या दिवसाखेर १६५ धावाच करू शकला. परंतु पाचव्या दिवसाअंती त्यांचा दहावा खेळाडू नाबाद राहिल्याने सामना अनिर्णीत राहिला.

यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा व शेवटचा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून सुरू होणार असून ७ डिसेंबर रोजी संपेल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विक्रमी अश्विन! लॅथमची विकेट घेताच ठरला भारताचा तिसरा यशस्वी कसोटी गोलंदाज, हरभजनला पछाडलं

कानपूर कसोटीत अश्विनने मोडला हरभजनचा ‘महाविक्रम’, मातब्बर फिरकीपटूने असे काही करत जिंकली मने

आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघ ‘या’ खेळाडूंना करणार रिटेन?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---