इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल)च्या प्ले ऑफच्या शर्यतीच्या दृष्टीने आता प्रत्येक सामन्याला महत्त्व आहे. 12 सामन्यांत एक विजय मिळवणाऱ्या नॉर्थ ईस्ट युनायटेड या शर्यतीतून बाद झाल्यात जमा असले तरी त्यांचा प्रत्येक निकाल हा प्रतिस्पर्धींची चिंता वाढवणारा नक्की आहे. अजूनही प्ले ऑफच्या स्पर्धेच्या आशा कायम असलेल्या बंगळुरू एफसीला 3 गुणांसाठी अखेरच्या मिनिटापर्यंत यजमानांनी झुंजवले. शिवा नारायणनच्या गोलने बंगळुरूला आघाडी मिळवून दिली, परंतु नॉर्थ ईस्ट युनायटेडकडून रोमेन फिलिपोटूने बरोबरीचा गोल केला. नॉर्थ ईस्टचा बचाव आज भक्कम राहिला आणि गोलरक्षक मिर्शाद मिचूचे कौतुक करावे तेवढे कमी. हा सामना बरोबरीत सुटेल असे संकेत असताना 90+4 मिनिटाला उदांता सिंगच्या क्रॉसवर ॲलन कोस्टाने हेडरद्वारे भन्नाट गोल केला अन् बंगळुरूचा 2-1 असा विजय पक्का केला.
यंदाच्या पर्वातील पहिल्या टप्प्यातील सामन्यातही ॲलन कोस्टाच्या गोलवर बंगळुरूने 1-0 असा विजय मिळवला होता. त्याची परतफेड करण्याचा नॉर्थ ईस्टचा प्रयत्न होता अन् 9व्या मिनिटाला त्यांच्याकडून गोल करण्याचा पहिला प्रयत्न झाला. विलमार गिलला संधी मिळाली होती अन् गोलपोस्टच्या जवळ त्याच्याकडून खूप साधारण प्रयत्न झाला. तो बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत संधूने सहज रोखला. पहिल्या 30 मिनिटांच्या खेळात चेंडूवर ताबा राखण्याचाच खेळ झाला. नवव्या मिनिटाला नॉर्थ ईस्ट कडून एकमेव ऑन टार्गेट प्रयत्न झाला तेवढाच. दोन्ही संघ फारच बचावात्मक खेळत होते. 37व्या मिनिटाला नॉर्थ ईस्टने बचावाचे रुपांतर त्वरीत आक्रमणात करताना बंगळुरूच्या बचावफळीत खळबळ माजवली होती. पण, अंतिम दिशा देण्यात तेही अपयशी ठरले अन् गोलशून्य बरोबरी कायम राहिली. 42व्या मिनिटाला नॉर्थ ईस्ट पुन्हा आक्रमणाला निघाले, परंतु प्रग्यान गोगोईने फार सुमार पास दिला.
बंगळुरू काऊंटर अटॅक वर गोल करण्याच्या अगदी नजीक पोहोचले होते, परंतु गोलरक्षक मिर्शाद मिचूने पुढे येऊन शिवाशक्तीचा हा प्रयत्न छातीने रोखला. 45व्या मिनिटाला झेव्हियर्ड हर्नांडेझना बॉक्सबाहेरून फ्री किक मिळाली. त्याचा हा प्रयत्न गोलपोस्टच्या वरून गेला अन् पहिल्या हाफमधील बंगळुरूने ही सोपी संधी गमावली. नॉर्थ ईस्टचा बचाव सुरेख राहिला. मध्यंतरानंतर बंगळुरू एफसीने गोल खाते उघडले. पराग श्रीवासच्या पासवर शिवा नारायणनने अप्रतिम गोल केला. पुढच्या मिनिटाला नॉर्थ ईस्टच्या विलमार गिलने ऑन टार्गेट प्रयत्न केला, परंतु बंगळुरूच्या गोलरक्षकाने तो रोखला. गोलनंतर शिवा डग आऊटमध्ये बसलेल्या सुनील छेत्रीला भेटायला गेला. आज छेत्रीला सुरूवातीपासून खेळण्याची संधी दिलेली नाही.
विलमार गिलने दुखापतीमुळे मैदान सोडले अन् नॉर्थ ईस्टला आणखी एक धक्का बसला. 64व्या मिनिटाला बॉक्सच्या इंचाच्या अंतराने बाहेर कोस्टाच्या हाताला चेंडू लागला अन् नॉर्थ ईस्टने पेनल्टीची मागणी केली. पण, रेफरीचा निर्णय योग्य होता. नॉर्थ ईस्टला बॉक्स बाहेरून फ्री किक मिळाली. रोमेन फिलिपोटूने भन्नाट गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. बंगळुरूने उभ्या केलेल्या बचावभींतीच्या पायाखातून रोमेनने हा गोल केला अन् बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत खेळाडूंवर संतापला. बंगळुरूला 74व्या मिनिटाला बॉक्सबाहेर फ्री किक मिळाली, परंतु त्यांना आघाडी घेता आली नाही. 80व्या मिनिटाला नॉर्थ ईस्टच्या गोलरक्षक मिचूने आणखी एक सुंदर बचाव केला. 81व्या मिनिटाचा सुनील छेत्रीच्या गोलपोस्ट जवळील बुलेट हेडर मिचूने रोखला. छेत्रीला स्वतःला यावर विश्वास बसला नव्हता, पण मिचूच्या बचावाला तोड नव्हता.
बंगळुरूने 8 शॉर्ट ऑन टार्गेट राखले अन् त्यावर केवळ 1 गोल त्याला करता आला. बंगळुरूकडून सातत्याने आक्रमण होत राहिले आणि नॉर्थ ईस्टकडून तितक्याच सक्षमपणे पेनल्टी क्षेत्रात बचाव झाला. ९०व्या मिनिटाला नॉर्थ ईस्टकडून जबरदस्त प्रयत्न झाला. इम्रान खानला मोक्याच्या क्षणी बंगळुरूच्या बचावपटूने रोखले. 90+4 मिनिटाला कोस्टाने हेडरद्वारे गोल करून विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. बंगळुरूने 2-1 असा विजय मिळवताना 13 गुणांसह आठव्या क्रमांकावर झेप घेतली.
निकाल: बंगळुरू एफसी 2 ( शिवा नारायणन 50 मि., ॲलन कोस्टा 90+4 मि.) विजयी वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड 1 ( रोमेन फिलिपोटू 66मि.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
समकालीन दिग्गज फलंदाजाच्या प्रश्नावर लाराने घेतले ‘या’ भारतीयाचे नाव; गोडवे गात म्हणाला, ‘नाकातून रक्त…’
आता 16 नाही, तर 20 संघांसोबत खेळला जाणार टी20 विश्वचषक 2024; सर्व माहिती एकाच क्लिकवर