बांग्लादेशचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनवर एका व्यक्तीच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांग्लादेशचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. शाकिब त्या संघासोबत आहे. शाकिब अल हसन व्यतिरिक्त बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरही हत्येचा आरोप आहे. हसीना काही दिवसांपूर्वीच बांगलादेश सोडून गेल्या होत्या.
बांग्लादेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा खटला पीडितच्या वडिलांनी दाखल केला आहे. क्रिकेटपटू शाकिब अल हसन अवामी लीग पक्षाचा खासदार आहे. बांग्लादेशातील राजकीय संकटानंतर अवामी लीग पक्षाचं सरकार बरखास्त झालं, ज्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांग्लादेश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. शाकिब अल हसन, शेख हसीन यांच्याशिवाय अन्य 154 जणांवर हत्येचा आरोप आहे. याशिवाय या प्रकरणात 400 ते 500 अज्ञात लोकांचा सहभाग असल्याचाही आरोप आहे.
खटल्यानुसार, 5 ऑगस्ट रोजी ज्या व्यक्तीची हत्या झाली होती, तिनं एका निषेध रॅलीत भाग घेतला होता. रॅलीदरम्यान सुनियोजित कटाचा भाग म्हणून कोणीतरी जमावावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. यादरम्यान या व्यक्तीच्या छातीत आणि पोटात गोळी लागली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
बांग्लादेश क्रिकेट संघ सप्टेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. मात्र खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या दौऱ्यासाठी शाकीब उपलब्ध असेल की नाही, हा मोठा प्रश्न आहे. शाकिब अल हसन या महिन्याच्या सुरुवातीला कॅनडामध्ये झालेल्या GT20 स्पर्धेत भाग घेतल्यानंतर थेट पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. अहवालानुसार, शाकिब अल हसनला बांग्लादेशच्या अंतरिम सरकारनं पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होण्याची परवानगी दिली होती.
हेही वाचा –
आयसीसीची विशेष योजना, आता टी20 प्रमाणे कसोटी खेळाडूंवरही होणार पैशांचा वर्षाव!
ऐकावं ते नवलच! स्वत:च्याच मुलाविरुद्ध मैदानावर उतरला दिग्गज क्रिकेटपटू
147 वर्षांच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं! आशिया खंडाबाहेर श्रीलंकेच्या गोलंदाजांचा पराक्रम