४३ सामन्यांपासून अपराजित असलेल्या बार्सिलोनासमोर हा हंगाम अपराजित संपवण्यासाठी केवळ २ सामने बाकी होते. मेस्सी, पीके, उमतीती यांना आराम देऊन आज बार्सिलोना संघ मैदानात ४-२-३-१ या रचनेत उतरला.
बार्सिलोना संघाला ९ व्या मिनिटलाच पहिला धक्का बसला. लेवान्टे तर्फे बोटेंगने गोल करत लेवान्टेला १-० ची बढत मिळवून दिली. बार्सिलोनाने सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला पण बचावफळीतील सततच्या चुका त्यांना पुन्हा एकदा महागात पडल्या. ३० व्या मिनिटला लेवान्टेने दूसरा गोल केला. हा गोल सुद्धा बोटेंगनेच केला.
८ मिनिटनंतर काॅटिन्होने पेनल्टी बाॅक्सजवळून बाॅल मारत सुवारेझ आणि पीकेच्या तयार केलेल्या संधीला गोलमध्ये रुपांतर करुन दिले. या गोल बरोबरच पुर्वार्धात सामना २-१ ने सुटला. उत्तरार्धात १ मिनिटनंतर लेवान्टेने परत एक गोल करत आपली २ गोलची आघाडी कायम केली.
४९ व्या मिनिटला बोटेंगने हॅट्रिक करत सामन्यात आश्चर्यकारक ४-१ ची आघाडी मिळवून दिली. बार्सिलोनाचा संघ यातून सावरेल असे वाटत असताना बार्धीने ५६ व्या मिनिटला गोल करत ला लीगाच्या विजेत्यांवर ५-१ ची बढत मिळवली. ५९ व्या मिनिटला काॅटिन्होने गोलपोस्टजवळ बाॅलला दिशा दाखवत बार्सिलोनासाठी दूसरा गोल केला.
अवघ्या ४ मिनिटने काॅटिन्होने हॅट्रिक करत तिसरा गोल केला आणि बार्सिलोनासाठी सामन्यात पुनरागमनाची एक संधी निर्माण केली. ७१ व्या मिनिटला सुवारेझने मिळालेल्या पेनल्टी कीकचे गोलमध्ये रुपांतर करत सामना ५-४ वर आणला. पुनरागमनाची संधी असताना सुद्धा बार्सिलोनाला पाचवा गोल करण्यात अपयश आले.
हा त्यांचा या हंगामातील ला लीगाचा पहिला पराभव होता. मेस्सीची गैरहजेरी आणि सुवारेझ, अल्बा, येरी मीना यांचा खराब खेळ बार्सिलोनाच्या पराभवाचे कारण ठरला. मेस्सीचे ३४ गोल्स झाले असून बार्सिलोनाचा अजून एक सामना बाकी आहे. त्याचा गोल्डनबुट जवळजवळ निश्चित झाला असून हा त्याच्या कारकिर्दितील पाचवा गोल्डनबुट असेल.