भारतात होणाऱ्या विश्वचषकाआधी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (8 सप्टेंबर) खेळला गेला. कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यातून इंग्लंड संघासाठी अष्टपैलू बेन स्टोक्स याने पुनरागमन केले. वर्षभरापेक्षा जास्तच्या कालावधीनंतर वनडे सामना खेळताना त्याने शानदार अर्धशतक झळकावले. यासह त्याने इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
स्टोक्स याने अतिरिक्त क्रिकेटचे कारण देत मागील वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली. त्यानंतर आता विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा वनडे कर्णधार जोस बटलर याने त्याला विनंती केल्यानंतर त्याने आपली निवृत्ती मागे घेतली. त्यानंतर आता तो न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरला.
डेव्हिड मलान व हॅरी ब्रुक 80 धावांची शानदार सलामी दिल्यानंतर ते दोघेही याच धावसंख्येवर तंबूत परतले. त्यावेळी चौथ्या क्रमांकावर स्टोक्स फलंदाजीला उतरला. आणखी 21 धावांची भर पडल्यावर रूट बाद झाला. संघ अडचणीत सापडलेला असताना स्टोक्स याने जबाबदारीने खेळ करत अप्रतिम अर्धशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने 69 चेंडूंमध्ये 52 धावा करताना 3 चौकार व एक षटकार ठोकला. त्याला रचिन रवींद्र याने बाद केले.
इंग्लंडच्या डावाचा विचार केला गेला तर इंग्लंडने निर्धारित 50 षटकात 291 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर मलान याने 54 व स्टोक्सने 52 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार जोस बटलर याने शानदार खेळ दाखवताना आक्रमक 72 धावा फटकावल्या. तर, लियाम लिव्हिंगस्टोनने 40 चेंडूंवर 52 धावा कुटल्या. न्यूझीलंड संघासाठी युवा रचिन रवींद्र याने 3 तर टीम साऊदीने 2 बळी टिपले.
(Ben Stokes Hits Fifty On His ODI Comeback Against Newzealand)
हेही वाचाच-
‘नेहमी आईचे ऐकत जा’, कन्कशन सबस्टिट्यूट लिजेंड लॅब्युशेनचा सल्ला, काय घडलं वाचाच
“तुम्ही बाहेरच्या एक्सपर्टना महत्व देता”, भारतीय प्रसारमाध्यमांवर भडकले गावसकर