ऑस्ट्रेलियाने क्रिकेट जगताला अनेक मोठमोठे क्रिकेटमधील हिरे दिले. त्यात ब्रॅडमनपासून ते स्टीव्ह वॉ, पाँटिंग, स्टीव्ह स्मिथपर्यंत अनेक नावं घेता येईल. ऑस्ट्रेलियन संघाने २००० आणि २०१० च्या दशकात क्रिकेटजगतावर जवळपास राज्य केलं. त्यांच्या संघाला पराभूत करणं सर्वच संघांसाठी कठीण परिक्षा असायची. त्यामुळे हा ऑस्ट्रेलिया संघासाठी एकप्रकारे सुवर्णकाळ समजला जातो. या काळात ऑस्ट्रेलियाकडून अनेक दिग्गज क्रिकेटपटू खेळले. त्यातील अखेरचा शिलेदार ठरला तो शेन वॉटसन. त्याचाच आज (१७ जून) ४१ वा वाढदिवस. वॉटसनने २०२०मध्ये क्रिकेटच्या सर्वप्रकारातून निवृत्ती स्विकरली होती. आपल्या अष्टपैलू खेळाने गेली अठरा वर्ष क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या या उमद्या खेळाडूच्या कारकीर्दीची २०२०मध्ये अखेर झाली. त्याच्या प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ या.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीपासून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड याठिकाणी जन्मलेल्या वॉटसनने अगदी लहानपणापासून क्रिकेटची बॅट हातात धरली. घराच्या अंगणात सुरू झालेला प्रवास हळूहळू मोठ्या क्रिकेट मैदानाकडे झाला. ऑस्ट्रेलियातील युवा खेळाडूंसाठी असलेल्या, ॲडलेड येथील ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीत सन २००० मध्ये त्याला प्रवेश मिळाला. आक्रमक फलंदाजी, उपयुक्त मध्यमगती गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने त्याने शालेय क्रिकेट चांगलेच गाजवले होते. याच कौशल्याच्या आधारे तो ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीसाठी निवडला गेलेला. खरंतर, बहुतांशी खेळाडू आपल्या राज्यासाठी आपला पहिला प्रथमश्रेणी सामना खेळतात. मात्र, वॉटसन वेगळा होता. त्याने आपला घरेलू संघ असलेल्या क्वीन्सलँडसाठी कारकीर्दीची सुरुवात न करता, टास्मानिया या शेजारी राज्याकडून केली.
ऑस्ट्रेलियात सर्वात चर्चिला गेलेला युवा क्रिकेटपटू
वॉटसनने २००० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. वॉटसनला बरेच जण मायकल बेवनचा उत्तराधिकारी मानत. वॉटसनसारखा अष्टपैलू ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात असल्याने त्यावेळचे आजी-माजी खेळाडू भलतेच खुश होते. वेळोवेळी ते वॉटसन भविष्यात मोठा खेळाडू होणार आहे, असे ठामपणे सांगत. त्यामुळे, सर्वांना प्रतीक्षा होती ती वॉटसनला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहण्याची.
आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर दुखापतीने हुकली २००३ विश्वचषकात खेळण्याची संधी
ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी एकदिवसीय स्पर्धा असलेल्या पुरा कपमध्ये वॉटसनने सर्वाधिक बळी मिळवले. सोबतच, मधल्या फळीत फलंदाजी करताना, त्याने चांगल्या स्ट्राईक रेटने धावादेखील जमवल्या. याच स्पर्धेतील कामगिरीमुळे, २००२ च्या सुरुवातीला वॉटसनचा समावेश ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात करण्यात आला. पदार्पणापासून काही मालिकेत त्याची कामगिरी संमिश्र होत होती. २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषकासाठी त्याची निवड देखील पक्की मानली जात होती. पण, ऐनवेळी माशी शिंकली. विश्वचषकाचा संघ जाहीर होण्यापूर्वी, सरावादरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली. सर्व चाचण्या केल्यानंतर सांगण्यात आले की, वॉटसन विश्वचषक खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी हा मोठा धक्का होता. कारण, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने वॉटसनमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक मोहिमेवर याचा परिणाम होणार होता. वॉटसनच्या अनुपस्थितीत देखील ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकत, आपले जगज्जेतेपद राखले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली देखणी कामगिरी
दुखापतीतून सावरल्यानंतर, वॉटसन पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघाचा नियमित सदस्य बनला. लवकरच पाकिस्तानविरुद्ध त्याने आपले कसोटी पदार्पण देखील केले. वॉटसन संघाचा नियमित खेळाडू बनल्याने, ऑस्ट्रेलियाला एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याची संधी मिळत. कारण, वॉटसन संघातील पाचव्या गोलंदाजाची उणीव भरून काढायचा. ऑस्ट्रेलियाचा पराभव झालेल्या २००५ ऍशेसमध्ये वॉटसनची वैयक्तिक कामगिरी चांगली होती.
भारतात आयोजित २००६ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऍडम गिलख्रिस्टसोबत त्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली. संघ व्यवस्थापनाने आपल्यावर टाकलेला विश्वास त्याने सार्थ ठरवत, भारताविरुद्धचा सामना जिंकून देण्यात, ऑस्ट्रेलियाला मदत केली. वॉटसनने २००३ मध्ये विश्वचषक खेळण्याची हुकलेली संधी २००७ विश्वचषकात साधली. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक विजयाची हॅटट्रिक पूर्ण करून देण्यात वॉटसनचा महत्वपूर्ण वाटा होता. २००९ चॅम्पियन्स ट्रॉफीत तो मालिकावीर ठरला. २०११ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने १५ चौकार व १५ षटकारांसह नाबाद १८५ धावांची खेळी केली होती. एका एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम वॉटसनने त्या सामन्यात केला होता. श्रीलंकेत झालेल्या २०१२ टी२० विश्वचषकात फलंदाजी आणि गोलंदाजीत एकसमान योगदान देत तो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.
वॉटसनला २०१३ भारत दौऱ्यावर पहिल्या आणि अखेरच्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा जिंकलेल्या २०१५ क्रिकेट विश्वचषक संघाचा तो उपकर्णधार होता. २०१६ मध्ये भारताविरुद्धच्या टी२० मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. सन २०१६ मध्ये वॉटसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. वॉटसनच्या निवृत्तीनंतर, ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या ‘गोल्डन इरा’ मधील सर्व खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाजूला झाले होते.
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील आकडेवारी
वॉटसनने २००२ ते २०१६ या चौदा वर्षांच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. ५९ कसोटीत ३,७३१ धावा व ७५ बळी आपल्या नावे केले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी असलेल्या वॉटसनने १९० सामन्यात ४०.५४ च्या सरासरीने ५,७५७ धावा आणि १६८ बळी मिळवले. ५८ टी२० सामन्यात त्याने १,४६२ धावांसह ४८ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
आयपीएलचा दिग्गज
वॉटसन टी२० चा एक आदर्श खेळाडू राहिला आहे. त्यांनी जगभरातील अनेक व्यावसायिक लीगमध्ये आपले कौशल्य दाखवले. मात्र, वॉटसनला ‘टी२० स्पेशालिस्ट’ म्हणून आयपीएलमुळे प्रसिद्धी मिळाली. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने आपल्या अष्टपैलू खेळाचे दर्शन सर्वांना घडवले. स्पर्धेत ४०० पेक्षा जास्त धावा आणि १७ बळी मिळवत राजस्थान रॉयल्सला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देखील त्यालाच मिळाला.
पहिल्या हंगामासारखी कामगिरी २०१३ मध्ये पुन्हा वॉटसनने केली. या हंगामात देखील तो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. आयपीएलच्या इतिहासात दोन वेळा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा तो पहिला खेळाडू होता. २००८ ते २०१५ अशी सात वर्षे त्याने राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले. २०१६ आणि २०१७ असे दोन हंगाम तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळला. २०१८ च्या आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्सने चार कोटींच्या रकमेत त्याला आपल्या संघात स्थान दिले. अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद शतकी खेळी करत त्याने चेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले. २०१९ आयपीएलच्या अंतिम सामन्यात पायातून रक्त येत असतानाही त्याने केलेली ८० धावांची झुंजार खेळी क्रिकेटचाहते कधीही विसरू शकत नाहीत.
आधुनिक क्रिकेटमध्ये जॅक कॅलिसनंतर सर्वात परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू मानला गेलेला शेन वॉटसन, निवृत्त झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील अखेरचा शिलेदार मैदानापासून दूर झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
आठवणीतील सामना: २३ वर्षांपूर्वी झाला होता क्रिकेट विश्वचषकातील सर्वात रोमांचकारी सामना, पाहा व्हिडिओ
‘त्याचा सामना करणे कधीच सोपे नव्हते…’, ऑस्ट्रेलियन स्पिनर वाढवतो भारतीय दिग्गजाच्या अडचणी
‘मी उमरान इतक्या वेगाने गोलंदाजी करू शकत नाही, पण…’ भारतीय गोलंदाजाने उलघडले मनातलं गुपित