भारत आणि न्यूझीलंड यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारीपासून (२५ नोव्हेंबर) सुरू झाली. पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू विश्रांतीवर आहेत. तर युवा खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. भारतीय संघाचे नवीन महागुरू राहुल द्रविडची प्रशिक्षकाच्या रूपातील संघासोबतची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. अशात पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असे चार खेळाडू आहेत, जे यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत खेळले आहेत.
गुरुवारी भारतीय संघात सामील केले गेलेल्या ११ खेळाडूंपैकी चार खेळाडू असे आहेत, ज्यांचा सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत त्यांचा निरोप सामना खेळण्याचा योग आला होता. द्रविडने २०१२ साली २४ ते २८ जानेवरी दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
या सामन्यात यष्टीरक्षक रिद्धिमान सहा, फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि उमेश यादव, हे भारतीय संघात सहभागी होते. त्यानंतर आता हे खेळाडू पुन्हा एकदा भारतीय संघाचा भाग आहेत. पण यावेळी राहुल द्रविड एका नवीन भूमिकेत आहे.
द्रविडसाठी हा ऑस्ट्रेलिया दौरा खूपच खराब ठरला होता. त्याने या दौऱ्यावरून मायदेशात परतल्यानंतर एक दिवस अचानक त्याच्या निवृत्तीची घोषणा केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने खेळलेल्या ८ डावांमध्ये १९४ धावा केल्या होत्या. या ८ डावांपैकी सहा वेळा द्रविड त्रिफळाचीत झाला होता. यानंतर त्याच्या या प्रदर्शनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. अशात भारतात परतल्यावर त्याने ९ मार्च २०१२ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तत्पूर्वी त्याने टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली होती.
दरम्यान, भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध या पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने सामन्याच्या पहिल्या डावात १११.१ षटकात ३४५ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. न्यूझीलंड संघ सध्या २१६ धावांनी पिछाडीवर आहे. यामध्ये भारतासाठी पदार्पण सामन्यात श्रेयस अय्यरने (१०५) शतक पूर्ण केले. तसेच रवींद्र जडेजा (५०) आणि शुभमन गिलने (५२) अर्थशतकी खेळी केली.
न्यूझीलंडच्या टिम साउदीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. काइल जेमिसनने तीन, तर एजाज पटेलने दोन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता १२९ धावा केल्या आहेत. सलामीवीर टॉम लॅथम (५०) आणि विल यंगने (७५) शतकी भागेदारी केली असून खेळपट्टीवर कायम आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशात बाबर आझमसिहत संपूर्ण पाकिस्तान संघावर झाला गुन्हा दाखल! कारण आहे गंभीर
रहस्य उलगडलं! ‘डेब्यू कॅप’ देताना असे काही म्हणाले होते गावसकर, श्रेयसलाही नव्हती या गोष्टीची कल्पना
भर सामन्यात अश्विनकडून घडली चूक, संतापलेल्या साउदीची थेट पंचांकडे तक्रार; पाहा घडलेला प्रकार