बांगलादेश संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत खूपच खराब कामगिरी करत आहे. अशात मंगळवारी (दि. 31 ऑक्टोबर) कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर रंगलेल्या स्पर्धेतील 31व्या सामन्यातही बांगलादेशच्या हाती पराभवच लागला. पाकिस्तानने त्यांना 7 विकेट्सने पराभूत केले. एवढंच नाही, तर बांगलादेश संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतूनही बाहेर पडला. हा त्यांचा स्पर्धेतील सहावा पराभव ठरला. या पराभवानंतर शाकिब अल हसन खूपच निराश झाला. त्याने मोठी प्रतिक्रिया दिली.
या पराभवासह बांगलादेश (Bangladesh) संघ विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडणारा पहिला संघ बनला. पाकिस्तान संघाकडून मिळालेल्या पराभवानंतर बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) खचला. त्याने माध्यमांशी बोलताना पराभवामागील कारणाचाही खुलासा केला.
पराभवामुळे खचला शाकिब
पाकिस्तान संघाकडून पराभूत होताच शाकिब म्हणाला, “आमच्या जास्त धावा नव्हत्या. खेळपट्टी वास्तवात चांगली होती. आम्ही पुन्हा सुरुवातीला विकेट्स गमावल्या. काही भागीदाऱ्या होत्या, पण मोठ्या भागीदाऱ्या नव्हत्या. बॅटमधून निराशाजनक प्रदर्शन राहिले. पाकिस्तानला याचे श्रेय जाते. त्यांनी ज्याप्रकारे गोलंदाजी केली आणि ज्याप्रकारे पहिल्या 10 षटकात फलंदाजी केली.”
पुढे बोलताना तो असेही म्हणाला की, “आम्हाला याविषयी विचार करावा लागेल. आमचे अव्वल 4 फलंदाज जास्त धावा बनवत नाहीयेत.” तो असेही म्हणाला की, “मी अव्वल 4मध्ये फलंदाजी करत होतो, मी धावा करत नव्हतो. माझा आत्मविश्वासही कमी होता. सुदैवाने मला काही धावा करता आल्या, आता मी चांगले प्रदर्शन करत आहे. सध्या खूप गोष्टी बदलणे कठीण होते. आम्हाला पुढे जात राहायचे आहे. आम्हाला मिळून चांगले प्रदर्शन करावे लागेल. आम्हाला सामूहिक प्रदर्शनाची गरज आहे, जे होताना दिसत नाहीये. आणखी दोन सामने आहेत. आशा आहे की, आम्ही पुनरागमन करू शकू. आम्ही जिथेही जातो, तिथे प्रेक्षकांचा आम्हाला पाठिंबा मिळतो. आम्हाला त्यांना काहीतरी परत द्यावे लागेल, जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येईल.”
सलग 6 सामने गमावले
बांगलादेश संघाच्या विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत 7 सामने खेळताना त्यातील 6 सामने गमावले आहेत. संघाला एकमेव विजय अफगाणिस्तानविरुद्ध मिळवता आला होता. अफगाणिस्तान संघाविरुद्ध पहिला सामना जिंकत बांगलादेशने शानदार सुरुवात केली होती, पण नंतर त्यांना लय कायम ठेवता आली नाही. आता सलग 6 सामने गमावण्यासोबतच ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतूनही बाहेर पडले आहेत. (captain shakib al hasan pak vs ban bangladesh knocked out odi world cup 2023)
हेही वाचा-
‘आम्हाला माहिती होतं, तो जर टिकला…’, बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर बाबरने ‘या’ खेळाडूवर उधळली स्तुतीसुमने
कीवींना धक्का! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातूनही दिग्गज बाहेर, अधिकृत माहिती आली समोर