जगभरात 1.25 लाख लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर जवळपास 4600 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये भारतात 78 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. जगातील 90हून अधिक देश या व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत.
या व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला (Corona Virus) जागतिक साथीचा आजार घोषित केले आहे.
भारतामध्ये या व्हायरसचा सामना करण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. 29 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धाही 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्करांनी (Sunil Gavaskar) आपले मत व्यक्त केले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात धरमशाला येथे पहिल्या वनडे सामन्याआधी गावस्कर यांनी कोरोना व्हायरसबद्दल मोठे विधान केले आहे.
हिंदुस्तान टाईम्समधील एका वृत्तानुसार गावस्कर म्हणाले की, “कदाचित सुरुवातीलाच आपण या व्हायरसला गंभीरतेने घेतले नाही. पुढे पुढे तो पसरतच गेला. हा दोन लोकांपासून सुरु झाला आणि हळूहळू ही संख्या 20 त्यानंतर 200 पर्यंत वाढली. आता ही संख्या वाढतच आहे. अशामध्ये आपल्याला जितके होईल तितके सावधान राहिले पाहिजे. आता फोनवर आपल्याला जे काही उपाय आणि सल्ले मिळत आहेत, ते आपण अंमलात आणले पाहिजेत.”
“एक देश म्हणून आपण निश्चितच अधिक स्वच्छता ठेवू शकतो. सुधारण्याची मोठी गरज आहे. आशा आहे की यामुळे आपल्या सवयी सुधारतील. आपण कुठेही थुंकतो. कोणत्याही वस्तू कुठेही टाकून देतो. आपल्याला काहीच फरक पडत नाही. आशा आहे की यामुळे भारतीय लोकांच्या सवयींमध्ये नक्कीच सुधार होईल,” असे सवयींबद्दल बोलताना गावस्कर यावेळी म्हणाले.
सामन्याआधी गावस्करांनी तोंडाला मास्क लावला होता. ते म्हणाले की, तुम्ही सावधान रहा. मला वाटते की, स्वत:ला सुरक्षित ठेवण्यापेक्षा इतर काहीही महत्त्वाचे नाही.
ट्रेंडिंग बातम्या-
-डायपर घालून फलंदाजी करणारा क्रिकेटर आता थेट गांगुलीकडून घेणार फलंदाजीचे धडे
-एवढी मोठी मालिका रद्द होणे केवळ दुर्देवी आहे
-कोरोनाने अवघड केलंय! बीसीसीआयच्या नुकसानीचा आकडा लईच मोठा






