त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावरील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट्स गमावत 288 धावा केल्या. विराट कोहली यावेळी 87 धावा, तर रवींद्र जडेजा 36 धावांवर नाबाद खेळत आहे. याव्यतिरिक्त यशस्वी यजसवाल 57 आणि कर्णधार रोहित शर्मा 80 धावांवर बाद झाले. दुसरीकडे, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरलेला शुबमन गिल 10, तर अजिंक्य रहाणे 8 धावांवर बाद झाला. अशात शुबमन गिल याचा खालच्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय अंगलट येताना दिसत आहे.
वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी शुबमन गिल (Shubman Gill) याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी (3rd Number Batting) करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तो आतापर्यंत दोन्ही सामन्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. पहिल्या कसोटीविषयी बोलायचं झालं, तर तो फक्त 6 धावा करून बाद झाला होता. तसेच, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही तो खास प्रदर्शन करू शकला नाही. त्याला 12 चेंडूत फक्त 10 धावाच करता आल्या. केमार रोच याने त्याला तंबूचा रस्ता धरायला भाग पाडले.
विशेष म्हणजे, यापूर्वी तो कसोटी कारकीर्दीत फक्त एकदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. डिसेंबर 2021मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने वानखेडे स्टेडिअमवर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 47 धावा केल्या होत्या. कारकीर्दीतील 18 वा कसोटी सामना खेळत असलेल्या 23 वर्षीय गिलने सलामीवीर म्हणून कसोटीत 2 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत.
द्रविडशी बोलून घेतलेला निर्णय
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मालिकेच्या आधी सांगितले होते की, शुबमन गिल याने प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी बोलून तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतला होता. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये याच क्रमांकावर खेळतो. त्याच्या जागी यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं त्याने सोनं केलं. त्याने सलामीवीर म्हणून कारकीर्दीच्या पहिल्याच कसोटीत शतक झळकावले. तसेच, दुसऱ्या कसोटीत अर्धशतक केले. दुसरीकडे, गिल तिसऱ्या स्थानावर खास प्रदर्शन करताना दिसत नाहीये. त्याला मालिकेत आणखी एक वेळा या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते. जर गिल मोठी खेळी साकारण्यात यशस्वी झाला नाही, तर संघ व्यवस्थापन मोठा निर्णय घेऊ शकते.
मागील 9 डावात फक्त एक शतक
शुबमन गिलसाठी मागील 9 डाव खास ठरले नाहीत. यादरम्यान त्याला फक्त एक वेळा 50हून अधिक धावा करता आल्या. इतर 8 डावात तो 30 धावांचा आकडाही पार करू शकला नाहीये. बांगलादेशविरुद्ध डिसेंबर 2023मध्ये झालेल्या मीरपूर सामन्यात 20 आणि 7 धावा केल्या होत्या. त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 डावात, 21, 5 आणि 128 धावा केल्या. जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात तो 13 आणि 18 धावांवर बाद झाला होता. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन डावात त्याने 6 आणि 10 धावा केल्या आहेत. आणखी एक डावात फलंदाजीची संधी मिळाली, तर तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (cricketer shubman gill failed in 2nd consecutive test at number 3 on west indies tour yashasvi jaiswal doing well)
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय सलामी जोडीला 24 वर्षांनी सापडला मुहूर्त, ‘हा’ कारनामा करत खास यादीत पटकावला दुसरा क्रमांक
झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर यशस्वीचा विश्वविक्रम, बनला ‘असा’ पराक्रम करणारा दुसराच फलंदाज