एमएस धोनीचे नाव जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी मोजले जाते. त्याचाच नेतृत्वात भारताने टी२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वनडे विश्वचषक या आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने ३ वेळा आयपीएलही जिंकली आहे. धोनीला क्रिकेटची इतकी समज आहे की, तो नेहमी विरोधकांपेक्षा एक पाऊल पुढे राहतो. हेच कारण आहे की, जेव्हा जेव्हा एखादा खेळाडू धोनीला भेटतो तेव्हा तो त्याच्याकडून खेळाबाबत सल्ला घेतो.
मात्र, धोनीदेखील नेतृत्व करताना एका खेळाडूकडून सल्ला घेतो, हे वाचताना अजब वाटते ना? परंतु, हे सत्य आहे. चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने नुकताच याबाबतचा खुलासा केला.
धोनी या खेळाडूकडून घेतो सल्ला
महाराष्ट्राचा प्रमुख फलंदाज चेन्नई सुपर किंग्सचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर भाष्य केले. त्यामुळे या मुलाखतीत चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा फाफ डू प्लेसिसकडून सल्ला घेतो असा खुलासा केला.
ऋतुराज म्हणाला, “दोघे अनेकदा कित्येक तास एखाद्या विषयावर बोलत राहतात. धोनी कोणत्याही अनुभवी खेळाडूचा सल्ला घ्यायला मागेपुढे पाहत नाही. धोनी आणि डू प्लेसिस यांना एकमेकांबद्दल खूप आदर आहे. सामन्यानंतर दोघांमध्ये बरीच चर्चा होते. हे दोघे ५-१० मिनिट नाहीतर, २-२ तास चर्चा करताना दिसतात. सरावादरम्यान धोनी आणि डू प्लेसिस बर्यापैकी बोलतात. धोनी सामन्यादरम्यानही कधीकधी डू प्लेसिसचा सल्ला घेतो.”
आयपीएल २०२१ मध्ये केली शानदार कामगिरी
दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा डू प्लेसिस २०१४ पासून चेन्नई संघाचा भाग आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याने आत्तापर्यंत ७ सामन्यात ३२१ धावा फटकावल्या असून, त्याने सलग चार अर्धशतके ठोकण्याचा कारनामा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
राशीद खान करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री? पाहा काय दिलं उत्तर
‘इंग्लंडमध्ये कसोटी खेळणे एक आव्हान, पण…’, दिग्गज भारतीय क्रिकेटरची प्रतिक्रिया





