भारतीय क्रिकेट संघ शानदार फॉर्ममध्ये असून विश्वचषक 2023 स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या सलग आठही सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने आठवा सामना 5 नोव्हेंबर रोजी कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळला. या सामन्यात भारताने बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाला 243 धावांनी पराभूत केले. भारताच्या या जबरदस्त विजयानंतर पाकिस्तानचा माजी दिग्गज कर्णधार वसीम अक्रम याने भारतीय संघाचे गोडवे गायले. त्याने मजेत असेही म्हटले की, विश्वचषक 2023मधील सामने भारत आणि उर्वरित जगामध्ये होईल.
कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर पॉईंट्स टेबलमधील अव्वल दोन संघ भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघ आमने-सामने होते. विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या या 37व्या सामन्यात रोमांचकता गगनाला भिडली होती. पहिला डावातील भारतीय फलंदाजांची फटकेबाजी आणि दुसऱ्या डावातील भारतीय गोलंदाजांची जबरदस्त गोलंदाजी अक्षरश: पाहण्यासारखी होती. भारताने पुन्हा एकदा विरोधी संघाला एकतर्फी अंदाजात नमवले.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 विकेट्स गमावत 326 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा डाव 27.1 षटकात 83 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे आफ्रिका संघाला आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला.
‘भारताने तिन्ही विभागात बनवला दबदबा’
भारताच्या विजयानंतर माध्यमांशी बोलताना वसीम अक्रम (Wasim Akram) याने भारताच्या दबदब्याचा उल्लेख केला. त्याने म्हटले की, त्यांचा हात कुणीच पकडू शकत नाही. अक्रम म्हणाला, “भारत विरुद्ध उर्वरित जग, असे योग्य ठरेल. खेळाच्या तिन्ही विभागात पूर्णपणे दबाव पाहायला मिळाला. मग ते फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण. याने काहीच फरक पडत नाही की, ते प्रथम फलंदाजी करतात किंवा प्रथम क्षेत्ररक्षण. खेळाच्या या सर्व पैलूंवर त्यांचे नियंत्रण आहे. आजच्या प्रदर्शनाबाबत मी आणखी काय म्हणून शकतो.”
साखळी फेरीत भारताला एकमेव आव्हान दक्षिण आफ्रिकेकडून मिळेल असे बोलले जात होते. मात्र, त्यांनाही पराभवाचा धक्का बसला आता भारतीय संघाला आपला अखेरचा साखळी सामना 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळायचा आहे. कर्णधार रोहित शर्मा या सामन्यातही संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. तसेच, उपांत्य फेरीतही आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. (cwc 2023 former cricketer wasim akram lauds indian team for dominant win against south africa ind vs sa)
हेही वाचा-
‘तर रोहित शर्माने 20 सिक्स मारले असते’, दक्षिण आफ्रिकेला डिवचत शोएब अख्तरचे मोठे विधान
‘…म्हणून तुमच्याकडे विराटसारखा फलंदाज हवा’, ‘किंग’ कोहलीविषयी रोहितची जबरदस्त प्रतिक्रिया