भारताचा यष्टीरक्षक कर्णधार एमएस धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत निवृत्तीची संध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. या व्हिडिओत धोनीचे आवडते ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ हे गाणे वाजत आहे.
धोनीने आजपर्यंत त्याच्या कारकिर्दीत ५३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने १७ हजारांहून अधिक धावा केल्या. धोनीने ५३८ सामन्यांपैकी ३५० वनडे सामने, ९० कसोटी सामने तर ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
यावेळी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले. परंतू एक विक्रम मात्र धोनीचा थोडक्यात हुकला. धोनीने अजून २ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असते, तर तो १०० टी२० सामने खेळणारा जगातील चौथा आणि भारताचा दुसराच क्रिकेटपटू ठरला असता. पण आता धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याने त्याच्या नावावर १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याचा विक्रम होणार नाही.
भारताकडून केवळ रोहितने १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तसेच रोहित व्यतिरिक्त शोएब मलिक आणि रॉस टेलर यांनी १०० किंवा त्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारे क्रिकेटपटू –
११३ सामने – शोएब मलिक
१०८ सामने – रोहित शर्मा
१०० सामने – रॉस टेलर
९९ सामने – शाहिद आफ्रिदी
९८ सामने – एमएस धोनी