आयपीएलमध्ये बुधवारी (7 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सचा 10 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 167 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नई संघाला केवळ 157 धावा करता आल्या. केकेआरचा अष्टपैलू आंद्रे रसल आणि फिरकीपटू सुनील नरेन यांनी शानदार गोलंदाजी केली. कर्णधार दिनेश कार्तिकने त्यांचा योग्य वेळी वापर केला. कार्तिकची या गोलंदाजांना योग्यवेळी वापरण्याची रणनीती चेन्नई विरुद्ध यशस्वी ठरली.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याच्या निर्णयक्षमतेसाठी ओळखला जातो, पण बुधवारी केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकने आपल्या योग्य निर्णयांनी चेन्नईला आयपीएलच्या 21 व्या सामन्यात पराभूत केले. कार्तिकने सामन्यात काही अचूक निर्णय घेतले ज्यामुळे चेन्नईचा पराभव झाला. या लेखात कार्तिकच्या काही निर्णयांबद्दल आढावा घेऊ ज्यांनी या सामन्याला कोलकाताच्या बाजूने वळवले.
10 षटकानंतर नरेनला दिली गोलंदाजी
चेन्नईविरूद्ध कर्णधार दिनेश कार्तिकने फिरकीपटू नरेनला योग्य वेळी गोलंदाजी दिली. त्याने 10 षटकांनंतर नरेनला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, कार्तिकला माहित होतं की चेन्नई सुपर किंग्जची मधली फळी खूप कमकुवत आहे. धोनी, केदार जाधव फॉर्ममध्ये नाही आणि धोनीचा नरेन विरुद्धचा रेकॉर्ड चांगला नाही. आजपर्यंत धोनीला नरेनविरुद्ध चौकार किंवा षटकार मारता आलेला नाही. म्हणूनच त्याने नरेनचे षटके राखून ठेवले. याबरोबर त्याने युवा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचाही योग्य वापर केला , चेन्नईने 10 षटकांत 90 धावा केल्या होत्या आणि शेवटच्या 60 चेंडूत हा संघ फक्त 67 धावा करू शकला.
शेवटच्या षटकांत आंद्रे रसलला दिली गोलंदाजी
दिनेश कार्तिकने अष्टपैलू आंद्रे रसलला शेवटच्या 4 षटकांत गोलंदाजीची संधी दिली. वेगवान धावा करून चेन्नईला विजय मिळवून देण्याचा अष्टपैलू सॅम करनने प्रयत्न केला होता. पण रसलने त्याला बाद केले. केदार जाधवला रसलची गोलंदाजी खेळणे अवघड जात होते. ज्यामुळे चेन्नईला शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा करता आल्या नाहीत.
राहुल त्रिपाठीला सलामीची दिली संधी
कार्तिकने राहुल त्रिपाठीला चेन्नईविरुद्ध सलामीवीर म्हणून संधी दिली आणि राहुलनेही 81 धावांची मोठी खेळी करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. या सामन्यात कार्तिकच्या सर्व योजना यशस्वी ठरल्या.